वडवणी । वार्ताहर
तालुक्यातील आवरगाव येथील आजाराने ञस्त असणारया मधुकर लोखंडे यांच्या कुटूंबावर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली होती. मधुकर लोखंडे यांच्या घरी मंगळवारी लढा दुष्काळाशी फाऊंडेशनची टीम मदत घेऊन पोहोचली. फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड.राज पाटील यांनी यावेळी धान्य, किराणा सामान व काही नगदी रक्कम कुटुंबाला मदत म्हणून दिल्यामुळे या कुटूंबाला एक आधार मिळाला आहे.
धारुर तालुक्यातील आवरगाव येथील आजाराने त्रस्त असलेले मधुकर लोखंडे यांच्यावर पत्नी, वृद्ध आई आणि चार मुलींना जगवण्याची जिम्मेदारी आहे. मात्र आजारामुळे शरीर साथ देत नसल्यामुळे भीक मागून कुटुंबाला जगवण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यातच कोरोणासारख्या संसर्गजन्य आजाराने डोके वर केल्याने सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे लोखंडे यांना गावोगावी जाऊन भीक सुद्धा मागता येत नाही. घरामध्ये अन्न, किराणा सामानाचा तुटवडा असल्यामुळे कुटुंबावर वाईट वेळ आली होती. याबाबत माहिती होताच लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड.राज पाटील व त्यांचे सहकारी यांनी मंगळवारी दुपारी मधुकर लोखंडे यांच्या आवरगाव येथील घरी जाऊन त्यांना धान्य, किराणा सामान व काही नगदी रक्कम दिली. त्यामुळे या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. आणखी दानशूर मंडळींनी या कुटुंबाला मदत करावी असे आवाहनही यावेळी टीमच्या वतीने करण्यात आले. अॅड.राज पाटील यांच्यासोबत यावेळी टीमचे सदस्य पत्रकार अशोक निपटे, पत्रकार रामेश्वर गोंडे, अरुण मोरे, सुशील देशमुख होते. दरम्यान अॅड.राज पाटील यांनी मागील दिड महिण्यात वडवणी, माजलगांव, धारूर आणि परळी तालुक्यातील शेकडो गरजूंना धान्य, किराणा सामान व काही नगदी रक्कम देखील मदत म्हणून दिली आहे. अॅड.राज पाटील यांच्या दानशूर वृतीचे सर्वञ कौतुक होत आहे.
Leave a comment