बीड | वार्ताहर
संचारबंदी शिथील असताना बीड मधील व्यापाऱ्यांना दुकानात बसून मारहाण करत नंतर त्यांना अपमानित करून पोलीस ठाण्यात नेल्याच्या प्रकरणात येथील शहर ठाण्याचे निरीक्षक वासुदेव मोरे तसेच रुग्ण घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेचे निरीक्षक राजीव तळेकर या दोघांना शनिवारी(दि.16) रात्री उशिरा औरंगाबाद येथील नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले आहे.पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
बुधवारी (दि.13) सकाळी सुभाष रोडवरील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडल्यानंतर शहर ठाण्याचे निरीक्षक वासुदेव मोरे व कर्मचाऱ्यांनी तिथे जाऊन व्यापाऱ्यांना दुकानात घुसून मारहाण करत नंतर त्यांना पोलिस ठाण्यात नेत अपमानित केले होते. दरम्यान जिल्हाधिकारी यांचे दुकाने उघडण्याचे आदेश पोलिसांना माहीत नव्हते. हे आदेश माहीत झाल्यानंतर शहर पोलिसांनी व्यापाऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली होती. व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत दुकाने अघोषित बंद करण्याचा इशारा दिला होता. बीडमधील लोकप्रतिनिधींनीही व्यापाऱ्यांची बाजू मांडत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती.दरम्यान वाहतूक शाखेचे निरीक्षक राजीव तळेकर यांनी रुग्ण घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई केली होती.
याप्रकरणी दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्य पद्धतीवर टीका झाली, हे प्रकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहचले. अखेर
दोन्ही निरीक्षकांना औरंगाबाद नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले आहे.दरम्यान बीड शहराचा अतिरिक्त पदभार शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक सुनील बिर्ला यांच्याकडे तर वाहतूक शाखेचा पदभार पेठबीड ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
Leave a comment