जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश जारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय
बीड । वार्ताहर
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनाचा बीड जिल्ह्यात शिरकाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कळंब शहर परिसरातील सात कि.मी. अंतरावरील बीड जिल्ह्यातील आठ गावांमध्ये बफर झोन जाहीर केला आहे.शिवाय ही सर्व आठ गावे पूर्णवेळ अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
बफर झोन जाहीर झाल्याने अनिश्चित काळासाठी बंद झालेल्या गावांमध्ये केज तालुक्यातील मौ. सोनेसांगवी, मांगवडगांव, माळेगांव, लाखा, भोपळा, हादगाव, सुर्डी व बोरगांव या आठ गावांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशात नमूद केले आहे.
कळंब येथे नुकतेच कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी कळंबपासून सात कि.मी. अंतरावर बीड जिल्ह्यातील आठ गावांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना कळवले; शिवाय बाधित रुग्ण आढळून आलेल्या शहरापासून तीन कि.मी. परिसरात जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश नसल्याचेही त्यांनी सांगितले, तसेच बीड जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून या परिसरात बफर झोन जाहीर करणे आवश्यक असल्याचे म्हटले. त्यानुसार जिल्हाधिकारी रेखावार यांनी केज तालुक्यातील 8 गावांमध्ये शुक्रवारी (दि.15) बफर झोन जाहीर करत ही गावे अनिश्चित काळासाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू केली आहे.
Leave a comment