केज । वार्ताहर
तालुक्यातील मांगवडगाव येथील जमिनीच्या वादातून पारधी समाजातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींच्या खून प्रकरणातील बारा आरोपीना सत्र न्यायालयाने 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
युसुफवडगाव ठाणे हद्दीतील मांगवडगाव येथे दि.13 मे रोजी रात्री गट नंबर 171/3 मधील 10 एकर 12 गुंठे या वादग्रस्त व जमिनीचा दोन वर्षांपूर्वी पवार कुटुंबाच्या बाजूने निकाल लागला होता. त्यामुळे बाबू पवार आणि त्याची मुले ही दि.13 मे रोजी अंबाजोगाई येथून ट्रॅक्टरने मांगवडगाव शिवारातील जमिनीत पेरणीपूर्व मशागत करून जमीन ताब्यात घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधी गटातील मोहन निंबाळकर यांच्या कुटुंबातील लोकांना राग आला. त्यामुळे त्यानी कट रचून तलवार, कुर्हाड, पहार व टिकाव आणि गजाने मारहाण करून त्यांचा पाठलाग करून बाबू शंकर पवार (60) त्यांची मुले प्रकाश बाबू पवार (45) आणि संजय बाबू पवार (40) तिघांचा खून करण्यात आला.
धनराज बाबू पवार यांच्या फिर्यादीवरून सचिन मोहन निंबाळकर (32), हनंमुत मोहन निंबाळकर (33), राजेभाऊ काशिनाथ निंबाळकर (45),प्रभु बाबुराव निंबाळकर (75),बालासाहेब बाबुराव निंबाळकर (55), राजाभाऊ हरीचंद्र निंबाळकर (35), अशोक अरूण शेंडगे(24), कुणाल राजाभाऊ निंबाळकर (19), शिवाजी बबन निंबाळकर (48),बबन दगडू निंबाळकर (80), जयराम तुकाराम निंबाळकर (29,सर्व रा. मांगवडगाव, ता.केज) व संतोष सुधाकर गव्हाणे (420 रा. माळेगाव ता. केज या बारा आरोपी विरोधात गु. र. नं.106/2020 भा.दं. वि. 143, 147, 148, 149, 302, 307, 120(ब), 435, 427 सह 4,25 मोटार वाहन कायदा कलम शस्त्र प्रतिबंधक कायदा कलम 184 आणि अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक काय दा कलम 3(1) (जी) 3(2) (व्ही) (ए) 4(2) (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी या सर्व आरोपीना सत्र न्यायालय अंबाजोगाई न्यायालयाने दि. 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या तिहेरी हत्याकांडाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत. तिहेरी हत्याकांडाचा युवारिपाइंचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे, सरचिटणीस गौतम बचुटे, बाळासाहेब ओव्हाळ यांनी भेट घेतली आणि तहसीलदार यांना निवेदन दिले. तसेच वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, बाळासाहेब बांगर आणि जिल्हा महासचिव सुरेश बचुटे यांनीही भेटून सांत्वन केले.
आरोपींना पकडा;नातेवाईकांचा रस्तारोको
महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या व मानूसकीला काळिमा फासणार्या या तिहेरी हत्याकांडातील मृतदेहावर सर्व आरोपीना ताब्यात घेतले जाणार नाही आणि आमच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृतांच्या नातेवाईकांनी घेतल्यामुळे गुरुवारपासून तिन्ही मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागरात पडून होते. त्या घटनेला जवळजवळ 40 तास उलटून गेले होते.नातेवाईक आणि जमाव संतप्त झाला होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 9:30 वा. दरम्यान जमाव आक्रमक झाला. महिला,पुरुष व मुलांनी रस्त्यावरच ठाण मांडून उपजिल्हा रुग्णालयासमोर रस्ता रोको करीत वाहतूक अडविली होती.
तब्बल चाळीस तासानंतर कळंबमध्ये अंत्यविधी
तहसीलदार दुलाजी मेंढके, उपअधीक्षक राहुल धस,निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहाय्यक निरीक्षक आनंद झोटे, पत्रकार गौतम बचुटे, प्रा. हनूमंत सौदागर, डी.डी. बनसोडे, सय्यद माजेद यांनी त्यांच्या समाजातील भागवत पवार, राजाभाऊ पवार, खंडू काळे, चंद्रकांत पवार यांनी मयताचे नातेवाईक धनराज बाबु पवार, शिवाजी बाबू पवार आणि अजय पवार यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढली.त्यानंतर त्यानी मृतदेह ताब्यात घेतले.या तिन्ही मृतदेहावर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे पारधी समाजाच्या स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
Leave a comment