परजिल्ह्यातून, राज्यातून स्थलांतर वाढल्याने प्रशासन झाले सतर्क
बीड । वार्ताहर
कोरोना लढाईच्या अंतीम टप्प्यामध्ये जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांच्या सतर्कतेमुळे विशेषत: जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि प्रशासनातील इतर अधिकार्यांनी घेतलेल्या काळजीमुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये गेला आहे. दरम्यान शासनाने तिसर्या लॉकडाऊनमध्ये परजिल्ह्यात, परराज्यात आणि परदेशात अडकलेल्या नागरिकांना, नौकरदार वर्गाला, मजूरांना, कामगारांना आपापल्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे मोठमोठ्या शहरातून, त्या शहरातील असलेल्या कंटेनमेंट झोन, हॉटस्पॉटमधून अनेक नागरिक आपल्या गावामध्ये दाखल होत आहेत. जिल्ह्यातही वेगवेगळ्या गावात मोठमोठ्या शहरातून, परराज्यातून अनेक कुटूंब गावात परतत आहेत. यामुळे त्या त्या गावामध्ये राहत असलेल्या ग्रामस्थांमध्ये, शहरातील नागरिकांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले असून या माध्यमातून शहरालाही धोका निर्माण होवू शकतो अशी भिती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. प्रशासनातील अधिकार्यांनाही या धोक्याची जाणीव असून येणार्या नागरिकांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या असल्या तरी चेकपोस्ट टाळून छुप्या मार्गाने बहुतांश नागरिक आपापल्या गावी दाखल होत आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याला पुन्हा धोका होवू शकतो का? अशी शंका घेण्यात येवू लागली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक आदि जिल्ह्यांमध्ये पहिल्या लॉकडाऊनपासून रूग्ण आढळून येवू लागले आहेत. विशेषत: मराठवाड्यामध्ये औरंगाबादने तर पुण्यालाही मागे टाकले आहे. औरंगाबादच्या पाठोपाठ जालन्याचा क्रमांक लागला आहे. नांदेडमध्येही संख्या वाढत आहे. मात्र बीडमध्ये अद्यापही कोरोना संसर्ग झालेला रूग्ण आढळून आलेला नाही. बाहेरून येणार्या नागरिकांची सुरूवातीपासूनच आरोग्य तपासणी आणि क्वारंटाईन करणे हे प्रशासनातील अधिकार्यांनी काळजीपूर्वक केल्याने कोरोना संसर्ग होवू शकला नाही. बीड शहरात आणि शहरालगत हजारो नागरिक क्वारंटाईन केले होते. त्यांच्यावरही प्रशासनातील अधिकार्यांनी विशेषत: पोलिसांनी आणि शिक्षकांनी बारकाईने लक्ष ठेवले होते. जिल्ह्यातील कुठल्याही गावातील नागरिक बाहेर पडत नव्हता मात्र तिसर्या लॉकडाऊनमध्ये शासनानेच मोठ्या शहरात अडकलेल्या नौकरदार, कामगार आणि मजूर यांच्यासाठी स्थलांतर करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर परराज्यात आणि परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी विशेष विमानेही सोडण्यात आली. मजूरांना सोडण्यासाठी 300 पेक्षा अधिक रेल्वे सोडण्यात आल्या. जिल्हास्तरावरून एसटी महामंडळाच्या बसेसही धावल्या. अजूनही हे स्थलांतर सुरूच आहे. बीड जिल्ह्यात विविध गावांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, दिल्ली तसेच इतर राज्यातून अनेक नौकरदार, कामगार आणि मजूर दाखल होत आहेत. त्या ठिकाणाहून येताना ते आरोग्य तपासणी करून येत आहेत. मात्र यातील काही मंडळी बिंधास्तपणे चोरट्या वाहतूकीतून छुप्या मार्गाने आपापल्या गावात दाखल होत आहेत. आणि याच लोकांपासून जिल्ह्यातील गावांना धोका निर्माण होवू शकतो अशी भिती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. सुरूवातीपासूनच कोरोनामुक्त जिल्हा म्हणून बीडचा उल्लेख केला जात आहे. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे मराठवाड्यात नव्हे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात कौतुक केले गेले. मात्र मोठमोठ्या शहरातून हॉटस्पॉट भागातील जर एखादा लागण झालेल्या नागरिक गावात पोहचला तर त्यापासून धोका होवू शकतो याची जाणीव आणि माहिती प्रशासनातील अधिकार्यांनी देखील आहे. आगामी काळात ईद सणाच्या पार्श्वभूमीवर तसेच शासनाने परवानगी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होवू लागल्याने जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे.
यंत्रणा सतर्क करण्याची गरज
सुरूवातीपासूनच बीड जिल्ह्यात प्रशासनाने यंत्रणा सतर्कपणे राबवली. पण गेल्या दोन तीन आठवड्यापासून चेकपोस्टपासून तर गावातील ग्रामसेवकांपर्यंत सर्वच यंत्रणा ढेपाळली आहे. चेकपोस्टवर फारसे लक्ष न देता वाहने सोडण्यात येत आहे. तर अनेकजण छुप्या मार्गाने येत आहेत. गावागावात आणि शहरांमध्ये मोठ्या शहरातून स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे ग्रामपातळीपासून ते शहरापर्यंत असलेली यंत्रणा पुन्हा सतर्क करण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दोन दिवसापूर्वीच या सर्व बाबींचा आढावा घेतला आहे. पोलिस प्रशासनाने गोंधळ न घालता या बाबीवर लक्ष ठेवावे तरच जिल्हा कोरोनामुक्त राहिल.
|
Leave a comment