केज तालुक्यातील मांगवडवगावची घटना
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार घटनास्थळी
पालकमंत्री पीडित कुटुंबाची घेणार भेट
केज । वार्ताहर
जमिनीच्या वादातून पित्यासह दोन मुलांचा खून झाल्याची घटना घडली. कौर्याची परिसिमा गाठणारी ही खळबळजनक घटना तालुक्यातील मांगवडगाव येथे बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार पहाटे घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणात 13 आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या घटनेची दखल घेतली असून आज ते पिडीत कुटुंबाची भेट घेणार आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, बाबू शंकर पवार (60), प्रकाश बाबू पवार (45) व संजय बाबू पवार (40) अशी मयतांची नावे आहेत. तर दादुल्या प्रकाश पवार ही महिला मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे. युसूफवडगाव ठाणे हद्दीतील मांगवडगाव येथील पारधी समाजातील बाबू पवार आणि सवर्ण समाजातील निंबाळकर कुटुंबात मागील काही वर्षां पासून गट नंबर 171/3 यातील 10एकर 12 गुंठे जमिनीचा वाद सूरु आहे. त्यांच्यात अनेक वेळा भांडणे झाली आहेत. अनेकवेळा मारहाण देखील झालेल्या आहेत. तसेच त्यांच्यात अनेक वेळा एकमेकांवर पोलीस केस देखील झालेल्या आहेत. यामुळे पारधी समाजाचे पवार कुटुंबीय हे मागील काही वर्षांपासून अंबाजोगाई येथील यशवंतराव चौकात राहत होते.
बुधवारी बाबू शंकर पवार आणि त्यांची मुले प्रकाश बाबू पवार, संजय बाबू पवार, धनराज बाबू पवार, शिवाजी बाबू पवार, दादूली संजय पवार व त्यांचे कुटुंबातील लहान मोठे असे एकूण वीस व्यक्ती हे त्यांच्या शेतात पेरणी पूर्व मशागत करण्यासाठी आले एका ट्रॅक्टर मधून मांगवडगाव येथील शेतात आले होते. याचा राग येऊन आता ते जमिनीवर ताबा करतील म्हणून निंबाळकर कुटुंबातील सर्वांनी कट केला.रात्री दहाच्या दरम्यान सर्व मिळून हातात काठ्या कुर्हाडी, लोखंडी गज व तलवारी घेऊन ते शेतात गेले. जिथे संसारोपयोगी साहित्य घेवून शेतात थांबले होते तिथे त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला एवढा पूर्वनियोजित होता की, कुटुंबाला पळून जाता येऊ नये म्हणून पवार कुटुंबाकडे असलेल्या तीन दुचाकींना आग लावून त्यांची नासधूस केली. अचानक झालेल्या आल्यामुळे पवार कुटुंब हे जीव वाचविण्यासाठी सैरावर पळत असताना त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर सपासप कुर्हाड, तलवार व लोखंडी गजाने वार केले तसेच ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या उजेडाने त्यांना एकेकाला पकडून मारले.
यात बाबू शंकर पवार त्यांची मुले प्रकाश बाबू पवार संजय बाबू पवार व हे तिघे बापलेक जागीच मृत्युमुखी पडले. तसेच दादूली संजय पवार हिस पण मारहाण करण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना एवढी भीषण होती की तिन्ही मृतदेह हे वेगवेगळ्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेत धनराज बाबू पवार, शिवाजी बाबू पवार आणि कुटुंबातील लहान मुले ही जिवाच्या आकांताने पळून गेली म्हणून ते वाचले. घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, स्वाती भोर, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आनंद झोटे, केजचे पोनि प्रदीप त्रिभुवन हे घटनास्थळी पोहोचले.या हत्याकांड प्रकरणी तेरा लोकांना संशयित म्हणून रात्रीच ताब्यात घेतले आहे.दरम्यान मागील वीस वर्षांपूर्वी निंबाळकर कुटूंबातील मोहन निंबाळकर हे बेपत्ता झाले होते आणि त्यांचा खून हा बाबू पवार व त्याच्या कुटुंबीयांनी केला असा आरोप पवार कुटुंबावर होता. त्या आरोपातून पवार कुटूंबियांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता देखील झालेली आहे.मात्र अद्यापपर्यत मोहन निंबाळकर यांचा तपास लागलेला नाही अशी चर्चा गावात आहे.
नातेवाईकांचा प्रंचड आक्रोश
दरम्यान या निर्घृण हत्याकांडाची माहिती मिळताच परिसरातील पारधी समाजाचे सुमारे दोनशे ते अडीचशे महिला व पुरुष केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पोचले होते आणि या हत्याकांडाबद्दल प्रचंड आक्रोश व रोष व्यक्त करीत होते. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः केज येथे तळ ठोकून असून मयताचे भाऊ यांच्या फिर्यादीनुसार युसुफवडगाव ठाण्यात फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
Leave a comment