टिकटॉक व्हिडिओवर अश्लील कॉमेंट;ग्रुप अॅडमिनही गोत्यात
माजलगाव । वार्ताहर
टिकटॉक व्हिडिओवर अश्लील कॉमेंट देणे वाशिमच्या चार होमगार्डच्या अंगलट आले. त्या सर्वांवर येथील शहर पोलिसांत बुधवारी (दि.13) रात्री विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. ग्रुप अॅडमिनचाही आरोपींमध्ये समावेश आहे.
एका 38 वर्षीय महिलेने टिकटॉक व्हिडिओ तयार करुन स्वत:च्या अकाऊंटवर अपलोड केला होता. 1 मे 2020 रोजी हा व्हिडिओ ‘विदर्भ होमगार्ड सैनिक’ या व्हॉटस्अप ग्रुपवर शेअर करण्यात आला. त्याखाली तीन होमगार्डस्नी आक्षेपार्ह मजकूर टाकला. 45 होमगार्ड सैनिक एत्रित आले तर तुझं काय होणार? अशी धमकीवजा कॉमेंटही एकाने दिली. शिवाय अश्लील कॉमेंटही करण्यात आल्या. दरम्यान, व्हॉटस्अप ग्रुपमधील स्क्रीन शॉट पीडित महिला सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाले. त्याआधारे त्यांनी गुरुवारी शहर पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. त्यावरुन अमोल सुरोशे, सतीश घुले(रा. मंगरुळ ता. कारंजा जि. वाशिम), विजय गायकवाड (रा. शिवलाईन ता. वाशिम) व ग्रुप डमिन सुनील जाधव (रा. कारंजा जि. वाशिम) या चौघांवर विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, वाशिमच्या होमगार्डवर माजलगाव शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment