कॉल सेंटर पुन्हा सुरु; प्रकृती व प्रवास विषयक विचारपूस
बीड । वार्ताहर
बाहेर जिल्ह्यात अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाकडून सध्या जिल्ह्यात येण्यासाठी ऑनलाइन परवानगी दिली जात आहे. जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईनही केले जात आहे.प्रशासनाने आता या व्यक्तींशी फोनवरुन संपर्क सुरु केला आहे. यामुळे परवानगी दिलेल्यांपैकी किती लोक जिल्ह्यात आले आहेत, याची माहिती यातून मिळेलच शिवाय, त्यांच्या प्रकृती विषयकही माहिती मिळणार आहे. यासाठी मध्यंतरी बंद केलेले शिक्षकांचे कॉल सेंटर पुन्हा सुरु केले गेले आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जेंव्हा वाहतूक व्यवस्था सुरळीत होती तेंव्हा महानगरांमधून मोठ्या प्रमाणावर नागरिक जिल्ह्यात आले होते. विशेषत: पुण्या, मुंबईहून आलेल्या नागरिकांच्या याद्या, संपर्क क्रमांक मिळवून जिल्हा प्रशासनाने शिक्षण विभागाच्या मदतीने कॉल सेंटर सुरु केले होते. 50 शिक्षकांकडून हजारो नागरिकांची विचारपूस केली गेली होती.दरम्यान,वाहतूक व्यवस्था बंद होऊन चेक नाके सुरु झाले आणि नंतर कॉल सेंटर बंद केले गेले होते. आता पुन्हा लॉकडाऊनमुळे इतर जिल्ह्यात अडकलेल्या बीड जिल्ह्यात येऊ इच्छिणार्या नागरिकांना परवानगी दिली जात आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन आहे. यामुळे संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे येत आहे. गावात आल्यानंतर त्यांना 28 दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाता आहे. मात्र, परवानगी घेतलेल्यांपैकी नेमकेकिती जण गावात पोहचले आहेत. कुणी क्वारंटाईनचा शिक्का मारण्यापासून सुटले तर नाहीत. आलेत त्यांची प्रकृती कशी आहे. याबाबत चौकशी आवश्यक वाटल्याने पुन्हा हे कॉल सेंटर सुरु केले गेले आहे. बुधवारपासून 50 शिक्षक यामध्ये काम करत असून प्रशासनाने परवानगी दिलेल्या लोकांच्या यादीच्या आधारे त्यांना संपर्क केला जात आहे.
Leave a comment