गेवराई । वार्ताहर
मतदारसंघातील शेतकर्यांकडे कापूस, तूर व हरभरा पडून असून, कोरोना सारख्या महामारीने अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांचा शेतमाल नव्याने नोंदी घेऊन तातडीने खरेदी करावा, नसता 21 मे रोजी तहसील कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण सुरू करावे लागेल, असा इशारा आमदार लक्ष्मण पवार यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. सदरील निवेदन 14 मे रोजी तहसील कार्यालयात यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मार्केटिंग फेडरेशनला मागणी करून नव्याने नोंदी सह कापूस, तूर व हरभरा शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी निवेदन दिले आहे. शेतकर्यांचा कापूस, तूर व हरभरा शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी केल्यास त्याच्या मालाला योग्य भाव मिळेल. शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्यास, शेतकर्यांने कष्टाने पिकवलेला कापूस, तूर व हरभरा खाजगी व्यापार्याला कवडीमोल भावाने विकण्याची वेळ येईल. तसेच, 13 मार्च 2020 पासून कापसाची नोंद घेतली जात नाही. मधल्या काळात शासकीय कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकर्यांचा कापूस घरातच पडून आहे. शासन आदेशाने शासकीय कापूस खरेदीला सुरूवात झाली होती. परंतू, शेतकर्यांचा कापूस खरेदी करण्याला प्राधान्य देण्या ऐवजी व्यापार्यांकडूण कापूस खरेदी केला आहे. खरेदी संतगतीने चालू असून, शेतकर्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी सहा महिन्यापेक्षा अधिकचा काळ लागेल. तोपर्यंत पुढील हंगामातील कापूस शेतकर्यांकडे येईल. शासकीय कापूसखरेदी केंद्रावरज्या ग्रेडरची नियुक्ती केली आहे. शेतकर्यांकडे कापसाचा दर्जा चांगला नाही या नावा खाली पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी शेतकर्यांकडून करण्यात येत आहेत. याची दखल वरीष्ठांनी घेतली पाहिजे. शासनाने तातडीने नव्याने नोंदीसह कापूस, तूर व हरभरा शासकीय खरेदी केंद्र दि.20 मे 2020 पर्यात सुरू करावे, नसता, 21 मे 2020 वार गुरूवार रोजी तहसिल कार्यालय, गेवराई येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा आमदार लक्ष्मण पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
Leave a comment