वडवणीतील घटनेला कलाटणी
वडवणी । वार्ताहर
येथील सहा वर्षीय चिमुकलीची हत्या जन्मदात्याने वडिलांनीच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मतिमंद असलेल्या या चिमुकलीच्या उपचार खर्चाला कंटाळून पित्याने हे पाऊल उचलले. पोलिसांनी त्यास बुधवारी (दि.13) रात्री अटक केली.त्यास गुरुवारी वडवणी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलीसांच्या माहितीनुसार, अमृता गणेश शिंदे (6,रा.वडवणी) ही मुलगी 11 मे रोजी अचानक बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह मंगळवारी दुपारी गावाजवळील एका ओढ्यातील पाण्यात आढळला होता. या प्रकरणी गणेश शिंदेच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, वडवणी पोलिसांना फिर्यादी गणेश शिंदे याच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. त्यांनी त्याची कसून चौकशी केली तेंव्हा त्याने कबुली दिली. अमृता ही जन्मताच मतिमंद होती. तिच्या उपचारावर पाच लाख रुपये खर्च केला होता. मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती. तिच्या वैद्यकीय खर्च पेलविणे अशक्यप्राय बनले होते. त्यातच आई व स्वत:च्या आजारपणावरही मोठा खर्च झाला होता. त्यामुळे 13 रोजी गणेश शिंदे याने मुलीचा गळा दाबून तिला संपविले. त्यानंतर तिचा मृतदेह ओढ्यातील पाण्यात फेकून दिला. उत्तरीय तपासणीत अमृताचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गणेश विठ्ठल शिंदे यास बुधवारी रात्री अटक केली.सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक हे तपास करत आहेत.
----------
Leave a comment