व्यापार्यांनी एएसपींसमोर मांडली कैफियत
बीड । वार्ताहर
शहर पोलिस ठाण्याचे पीआय वासुदेव मोरे यांनी व्यापार्यांना केलेल्या मारहाण प्रकरणी गुरुवारी व्यापार्यांनी आपली कैफियत अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांना भेटून मांडली. हा प्रकार गंभीर असून याबाबत आपण वरिष्ठांना अहवाल देऊन व योग्य ती कारवाई करु असे आश्वास कबाडे यांनी दिली आहे. दरम्यान, पो.नि.वासुदेव मोरे यांची चौकशी लागण्याची शक्यता असून कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे.
बुधवारी संचारबंदी शिथीलतेच्या काळातही सुभाष रोड या व्यापारी पेठेत शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी दंडेलशाही करुन जिल्हाधिकार्यांचे आदेश असतानाही व्यापार्यांना दुकाने बंद करण्यास सांगून मारहाण केली. पोलिस वाहनातून ठाण्यात नेले अपमानीत केले, गर्भवती महिला व्यापार्याशीही असभ्य वर्तणूक केली. या सगळ्या प्रकाराबाबत आक्रमक झालेल्या व्यापार्यांनी पो.नि.मोरेंना निलंबीत करा अन्यथा दुकाने उघडणार नाही अशी भूमिका घेतली आहे. शिवाय, आमदार संदीप क्षीरसागर यांनीही हिच भूमीका घेत जिल्हाधिकार्यांना पत्र दिले आहे. गुरुवारी अधीक्षक कार्यालयाच्या बैठक कक्षात व्यापार्यांनी अपर अधीक्षक विजय कबाडेंची भेट घेतली. या वेळी उपअधीक्षक भास्कर सावंत, आमदार संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती. यावेळी मोरेंवर कारवाईचे आश्वासन अपर अधीक्षकांनी दिले.
Leave a comment