बीड । वार्ताहर
जिल्ह्यातून गुरुवारी (दि.14) सकाळी जिल्ह्यातून आणखी 15 जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीला प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. सायंकाळी त्यातील 14 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 1 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून गुरुवारी सकाळी 14 तसेच अंबाजोगाईच्या स्वाराती विलगीकरण कक्षातून 1 अशा एकूण 15 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. सायंकाळी हे अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले, बीडमधील 1 अहवाल येणे प्रलंबित असून उर्वरित 14 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. गुरुवरपर्यंत पाठवलेले सर्व 377 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
दरम्यान परजिल्ह्यातून आलेले 146 जण गृह अलगीकरणात तर 40 जण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण 46 हजार 296 ऊसतोड मजूर परतले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.
विनापरवानगी प्रवेश; सहा जणांवर गुन्हा
बुधवारी रात्री सुभाष रोडवर शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक बब्रुवाहन गांधले हे गस्त करत असताना त्यांना एक रिक्षा आढळून आला. चौकशीत सुरुवातीला रिक्षात काही सामान असल्याचे सांगण्यात आले मात्र, नंतर पाहणी केली असता त्यात सहा व्यक्ती होते. यातील काही मुगगाव, लोळदगाव, मांजर पिंपळगाव, काळेगाव हवेली येथील होते.त्यांच्यावर बब्रुवाहन गांधले यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद केला गेला.
Leave a comment