शेतकर्यांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन
बीड । वार्ताहर
सध्या उन्हाळ्याच्या कालावधीत शेतीमधील मशागतीची कामे सुरु आहेत. बीड जिल्ह्यामधील बरेचशे प्रकल्प, सिंचन, साठवण तलावातील पाणीसाठा कमी झालेला आहे. त्यामुळे अशा तलावातील मोठया प्रमाणावर गाळ मिळु शकतो. या गाळाचा वापर शेतकर्यांनी आपल्या शेतीसाठी केल्यास, शेत जमिनीची प्रत सुधारुण शेत जमिनीची सूपीकता वाढून, शेती उत्पन्नात वाढ होणार आहे. शेतकर्यांनी स्वखर्चाने गाळ काढून न्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
तलावात उपलब्ध असलेला गाळ शेतकरी शेतीसाठी स्वर्खचाने काढणार असतील, तर त्यासाठी संबंधीत यंत्रणांनी तातडीने नियोजन करुन शेतकर्यांमध्ये जनजागृती करावी. शेतकारी स्वखर्चाने गाळ घेऊन जाण्यास तयार असतील तर त्यांनी संबंधोत तहसिलदार तसेच सिंचन विभागाच्या कार्यालयाकडे संपर्क करुन रितसर परवानगी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.
सध्या बीड जिल्हयात जलसंपदा विभागाचे एकूण 5 मध्यम प्रकल्प व 30 लघू सिंचन तलाव व जलसंधारण विभागाचे 4 लघू पाटबंधारे व 4 साठवण तलांवापैकी ज्या तलावात अत्यल्प पाणीसाठा आहे, किंवा जे प्रकल्प कोरडे आहेत, त्यामधील गाळ काढण्याचे काम त्वरित संबंधित तलावाचे शाखा अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली करण्यात यावे. त्यानंतर ज्या प्रमाणात गाळ काढण्यासाठी बुडीत क्षेत्र उपलब्ध होईल त्याप्रमाणे सर्व कामे सुरू होतील याची दक्षता सिंचन विभागाने घ्यावी. तलावातील गाळ काढल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ होईल, तसेच सिंचन क्षमता वाढीस मदत होईल. लाभघारक शेतकरी यांना संबंधित तलाठी-तहसिलदार यांनी गाळ काढण्यासाठी सहकार्य करावे. तसेच पूरेशी जन जागृती करण्यात यावी अशा सूचना जिल्हधिकारी रेखावार यांनी मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने सर्व विभागांच्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. गाळ काढण्याच्या कामासाठी करोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता सामाजिक अंतर ठेऊन आवश्यक त्या उपाययोजना करून कामे त्वरीत हाती घ्यावीत.पावसाळा कालावधी लवकरच असल्याने उर्वरित कालावधीचा विचार करता विविध ठिकाणी एकाचवेळी कामे सुरू होतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणेने घ्यावी असे आवाहन जिल्हा जलसंचारण अधिकारी, लाभक्षेत्र विकास प्राधीकरणचे अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.
Leave a comment