केज तालुक्यातील खळबळजनक घटना
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह अधिकारी घटनास्थळी
केज | वार्ताहर
तालुक्यातील मांगवडगाव येथे शेतीच्या वादातून तिघांचा खून झाल्याची घटना घडली. ही घटना आज गुरुवारी पहाटे समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार व संजय बाबू पवार अशी मयतांची नावे आहेत. शेतीच्या वादातून झालेल्या सामूहिक हल्ल्यातून मांगवडगाव येथील पवार कुटुंबातील तीन जणांचा खून झाला, त्यांच्या घराचेही मारेकऱ्यांनी नुकसान केले, या घटनेत अन्य एक जखमी आहे. त्यास रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे.या प्रकरणी १७ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट दिली.यावेळी अपर अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहूल धस ,केजचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, युसफ वडगाव ठाण्याचे सहायक निरीक्षक आनंद झोटे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
जागेच्या वादातून घडलेली घटना
तिहेरी खुनाच्या या घटनेला जागेच्या जुन्या वादाची किनार आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, पवार आणि निंबाळकर कुटुंबीयांत दिवाणी कोर्टामध्ये जमीन वाद चालू आहे. यातून त्यांच्यात पूर्वीचा गुन्हा घडला होता. त्यावेळी सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती, दरम्यान नंतर 2018 व 2019 मध्ये आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. प्राथमिक माहितीनुसार, सध्या अंबाजोगाईत राहणाऱ्या पवार कुटुंबातील 20 जण बुधवारी रात्री मांगवडगाव बाहेरच्या वादग्रस्त ठिकाणी आले होते. ही माहिती मिळताच निंबाळकर गटाने त्यांच्यावर हल्ला केला. यात पवार कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, दरम्यान या प्रकारामुळे भयभीत झालेल्या इतरांनी मुख्य रस्त्यावरील एका पोलिस नाक्याचा आधार घेऊन नंतर गाव गाठलेे अशी प्राथमिक माहिती असूूून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. 17 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.
Leave a comment