राजकारणातले चित्र आणि नाटकातले पात्र सारखे बदलते राहते. नाटकातले जाऊद्या, मात्र, राजकारणात चांगला पायंडा पाडला जात आहे. राजकीय पक्ष आणि त्यांची विचारसरणी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देऊ लागली आहे. समाजकारणातून राजकारणात येणाऱ्यांसाठी आशादायी गोष्ट आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली की, लक्षात येते. तिघा पक्ष प्रमुखांनी नवे चेहरे दिले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना आनंद झाला असणार, उध्दवजींच्या नेतृत्वाखाली आघाडीने पाच उमेदवार दिले आहेत. काॅग्रेस ने दबाव आणून पाहीला पण जमले नाही. त्यांना माघार घ्यावी लागली.
मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, महिला नेत्या निलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काॅग्रेस पक्षाचे राजेश राठोड यांचा सभागृहातला प्रवेश निश्चित झाला आहे. शिवसेनेने निलम ताईना पून्हा एकदा संधी दिली. पवार साहेबांनी मिटकरी यांच्या डोक्यावर हात ठेवला आहे. तरूण आणि आक्रमक नेता, अशी मिटकरी यांची ओळख आहे. त्यांच्या भाषणाचे महाराष्ट्रभर चाहते आहेत. त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.
नऊ उमेदवार फायनल झाले आहेत. आता घोडेबाजार होणार नाही. भाजप 4, शिवसेना 2 , राष्ट्रवादी काँग्रेस 2 , काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येतील. बीड जिल्ह्याचे सुपुत्र पापा मोदी यांची लाॅटरी लागली होती. परंतू , त्यांना माघार घ्यावी लागली आहे. जिल्ह्य़ातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित, काॅग्रेसच्या रजनीताई , सिराज देशमुख, याची नावे सुद्धा चर्चेत होती. जागा कमी असल्याने त्यांचा विचार झाला नसावा.भाजपाने ही नवे चेहरे पुढे केलेत. डाॅ. गोपछडे , प्रविण दटके, गोपीचंद पडळकर या नव्या चेहर्यांना संधी मिळाली आहे. एकुणच, या निर्णयामुळे कार्यकर्त्यांना आनंदाचे भरते आले असताना, त्याचे वेळी दुसर्या बाजुला अस्वस्थता आहे. राजकारणात अनेकांची घराणेशाही आहे. त्यामुळे अपवाद सोडला तर, सामान्य कार्यकर्त्यांना सहज आमदार, खासदार होता येत नाही, हे वास्तव आहे. आमदार, खासदार खुप लांबची गोष्ट आहे. त्यापेक्षा कमी दर्जाची पदे ही मुश्किलीने मिळतात. परंतू ,अलीकडच्या काळात सर्व सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे ब्लॅकमेल करून राजकारणात आता फार काही मिळवता येत नाही. थेट पंगा घेऊन काही मिळवायचे असेल तर, त्यासाठी ताकद लागते. भाजपाने नावे जाहीर करताच जेष्ठ नेते एकनाथ खडसे, ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्या सह इच्छुक नेते मंडळी नाराज झाली आहे. कार्यकर्त्यांनी सोशल नेटवर्किंग च्या माध्यमातून राग व्यक्त केला आहे. अपेक्षेप्रमाणे खडसे साहेबांचा पून्हा एकदा तोल सुटला. खर म्हणजे, त्यांनी आत्मचिंतन करायला हवे होते. त्यांच्या कडे वेळ होता मात्र , पक्षाने केलेल्या दुर्लक्षामुळे ते हतबल झालेत. त्यांनी बेछूट आरोप करून पक्षातील प्रमुख नेत्यांनाच आव्हान दिले आहे. भाजपा नेतृत्व फडणवीस यांच्याकडे आहे. असे असताना, त्यांनाच टार्गेट करून कसे चालेल ? उलट समन्वय साधून फडणवीस यांच्याशी जमवून घ्यायला पाहिजे होते. खडसे आणि मुंडे यांना ते जमले नाही. विधानसभा निवडणुकीत खडसे यांच्या मुलीचा पराभव झाला. एवढा अनुभव असलेला जेष्ठ नेता, पण महत्वाकांक्षा आडवी आली. मी पक्षासाठी हे केले, ते केले. कोणी नव्हते, तेव्हा मी पक्ष वाढविला, हे आता आलेत आणि तिखट झालेत. त्याच त्याच पालुपदाचा गजर करीत सुटलेत. त्यांना हे समजून कोण सांगणार की, तुम्ही पक्ष मोठा केला. हे खरय, मग आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते, अशा अनेक महत्वाच्या पदाचा कोणी उपभोग घेतला ? तुम्हीच ना, मग भुतकाळात कशाला डोकावता ? अशाने स्वतच्या अस्तित्वाला तडा गेला. त्यामुळे, तेल ही गेले आणि तुप ही गेले आहे. एवढे सगळे होऊन ही, ते परळीला आले. त्यांना पंकजा ताईनी बोलावले. त्या व्यासपीठाचा पुरेपुर फायदा घेतला. जेष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या समोर त्यांनी पक्षाची लक्तरे वेशीवर टांगली. यामुळे त्यांचे तर नुकसान झालेच, पंकजा ताई विषयी वेगळा संदेश गेला. त्या ही सभेत काहीबाही बोलल्या. फडणवीस यांच्याकडेच बोट दाखवले. आता ही, त्या नाराज झाल्याची चर्चा आहे. आव्हान देऊन मिळत नाही, भाजपात तर नाहीच नाही, हे ज्यांना कळले..समजले ते मंत्री, मुख्यमंत्री झाले. अजूनही वेळ गेलेली नाही, ताईनी पॅचअप करून पुढे जायला हवे, त्यांना खुप संधी आहे. सगळे वाद - विवाद , मतभेद, मनभेदाचा त्यांनी द एन्ड करायला हवा. त्यांचे भगवान गडाशी फारसे पटत नाही. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. कार्यकर्ते काही सांगायला गेले तर त्यांच ही ऐकुन घेत नाहीत. पक्षांतर्गत विरोधक वाढलेत, असे एकाच वेळी किती जणांशी वैर घ्यायचे, त्यापेक्षा समन्वय रहावा म्हणून प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यांना हेच वाटते. त्या दृष्टीने प्रयत्न झाले तर अजून काही तरी चांगले होईल. राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो.
विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, यांना अपेक्षा होती. त्यांचा विचार झाला नाही, असे दिसते. खडसे आणि मुंडे यांची प्रतिक्रिया आली आहे. बाकीचे सायलेंट मोडवर आहेत. आता, एक गोष्ट अशी की, भाजपात अजूनही फडणवीस यांचाच वरचष्मा आहे. तो बराच काळ राहील असे दिसते. त्यांनी खडसे आणि मुंडे यांच्या नावाला विरोध ही केला नसेल, शिफारस करण्याचा तर प्रश्नच येत नाही. दोघांनीही प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्यांनाच विरोध केलेला आहे. ना. फडणवीस पक्षांतर्गत विरोधकां विषयी चकार शब्द बोलत नाहीत. किती गंमतीची गोष्ट आहे. शांत डोक्याने, पडळकर यांना संधी देऊन, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना शह दिला आहे. जानकर हे पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जातात. दटके हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. दटके यांना संधी देऊन पक्ष नेतृत्वाने निष्ठावान कार्यकर्त्याचा सन्मान केला आहे. डॉ. अजित गोपछडे यांच्या रूपाने नवखा चेहरा दिला आहे. आता खडसे, मुंडे आदि नेत्यांना थांबावे लागेल. राजकारणात अहंकाराने फायद्या पेक्षा नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ येते. पंचनामे करायला त्यावेळी अवतीभवती कोणीही नसते.....?
सुभाष सुतार ( पत्रकार )
Leave a comment