बीड । वार्ताहर
बीडमध्ये विवाह नोंदणी कार्यालय असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात पहिल्यांदाच बुधवारी (दि.13) सायंकाळी पावणेपाच वाजता एक विवाह पार पडला. सोशल डिस्टन्सिंग पाळत पार पडलेल्या या विवाहाची जिल्हाभरात चर्चा होत आहे.
औरंगाबादच्या प्रतिक्षा शामराव कोल्हे आणि बेलगाव (ता.केज) येथील प्रताप नरसिंग दातार यांचा बुधवारी विवाह निश्चित झालेला होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी विवाहास प्रतिबंध घातलेला आहे. त्यामुळे विवाह कोठे करायचा? असा प्रश्न कोल्हे आणि दातार कुटुंबियांसमोर उभा होता. दोन्ही कुटुंबियांनी बीडमधील सामाजिक कार्यकर्ते के.के.वडमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या पुढाकारातून बीडमध्ये कोरोना रोखण्यासाठी महत्वाची भुमिका बजावणार्या बीड पोलीस दलाचे प्रमुख अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या प्रमुख उपस्थित विवाह करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सायंकाळी पावणेपाच वाजता हा विवाह अधीक्षकांच्या कार्यालयात पार पडला. दरम्यान, कार्यालयाऐवजी अधीक्षक कार्यालयात विवाह पार पडण्याचा कदाचित हा पहिलाच प्रकार असावा.
पोलीसांचे आभार व्यक्त करण्यासाठी मागीतली विवाहाची परवानगी
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनामुळे तसेच बीड प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे बीड जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापपर्यंत रोखण्यात प्रशासनाला यश आलेले आहे. याविषयी पोलिसांना धन्यवाद देण्यासाठी व पोलिसांचे आभार व्यक्त करण्यासाठी दातार दांपत्याने पोलिस अधीक्षकांच्या समोर विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली त्या इच्छेला अनुसरून पोलीस अधीक्षकांना अधीक्षकांनी त्यांना मान्यता दिल्यामुळे हा विवाह पार पडल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी वधू-वरास बीड जिल्ह्याचा इतिहास हे पुस्तक एसपींनी भेट दिले.
Leave a comment