बीड । वार्ताहर
नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात कोरोनाबधित रुग्ण सापडल्यानंतर खबरदारी म्हणून जामखेडच्या जवळ असलेल्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील 04 किमी अंतरातील सहा गावे बफर झोन म्हणून घोषित केली गेली होती. बुधवारी या गावंची बफर झोनमधून मुक्तता करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश दिले.
बीड जिल्ह्याच्या लगत मात्र, नगर जिल्ह्यात असलेल्या जामखेड येथे कोरोनाचा रुग्ण काही दिवसांपूर्वी आढळून आला होता. यामुळे लगतच्या आष्टी तालुक्याला धोका नको म्हणून जामखेडच्या जवळ 4 किलोमीटर अंतरावरील हरिनारायण आष्टा , शिंदेवस्ती, चिंचपूर, भातोडी, क-हेवडगाव, मातकुळी सहा गावांची बफर झोन म्हणून घोषणा 23 एप्रिल रोजी करण्यात आली होती. अनिश्चित काळासाठी बफर झोन लागू करून सर्व प्रकारची बंदी इथे आणली गेली होती. मागील 14 दिवस आरोग्य विभागानेही पथकांची नियुक्ती करुन जनजागृती व आरोग्य तपासणी केली होती. नियमाप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने 14 दिवसानंतर बफर झोन शिथील करण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून विनंती केली होती. यानुसार हरिनारायण आष्टा , शिंदेवस्ती, चिंचपूर, भातोडी, क-हेवडगाव, मातकुळी या सहा गावातील बफर झोन बुधवारी शिथिल करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश काढले.
Leave a comment