तलवाडा । वार्ताहर
बीड जिल्ह्यात आजघडीला एकही रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह नसून जवळपास दोन महिन्यांपासून लोकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला चांगले सहकार्य करत स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली आहे. परंतु आता कोरोना बाधित भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या मुळगावी ग्रामीण भागात येऊ लागल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होतो की काय अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली असून याकडे ग्रामपंचायत, वैद्यकीय विभाग व पोलीस प्रशासनाने गांभिर्यपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी गेवराई तालुक्यासह तलवाडा व परिसरातील लोकांकडून होऊ लागली आहे.
कोरोना बाधित शहरी भागातील जे नागरिक त्याठिकाणी त्यांची गैरसोय होत असल्याने आपल्या मुलांबाळांसह मुळगावी ग्रामीण भागात येऊन त्यांच्या घरी होमक्वारंटाईनच्या नावाखाली राहू लागले आहेत अशा लोकांची काळजीपूर्वक दक्षता घेऊन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात यावेत अशी मागणी देखील आता ग्रामीण भागातील लोकांकडून होऊ लागली आहे. जे नागरिक सध्या शहरी भागातून आपल्या गावाकडे येत आहेत ते देखील या भागातील आहेत. परंतु ते वेगवेगळ्या कामधंद्यांमुळे शहरी भागात गेले होते व ते ज्या शहरातून येत आहेत ती शहरे कोरोना बाधित असल्याने या लोकांची भीती ग्रामीण भागातील लोकांना वाटू लागली आहे. जे नागरिक मोठ्या शहरातून आपल्या गावाकडे परतले आहेत त्यांची चौकशी करण्यासाठी अथवा माहिती घेण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे गेले तर ते त्या कर्मचार्यांना विनाकारण दमदाटी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे आता एवढे दिवस पोलिसांनी जी मेहनत घेतली ती वाया जाऊ नये यासाठी पुन्हा एकदा पोलिसांनीच पुढाकार घेऊन बाधित शहरातून आलेल्या लोकांना कायदेशीरपणे चौदा दिवस होमक्वारंटाईन होण्यासाठी समज द्यावी अशी मागणी देखील लोकांकडून होऊ लागली आहे. तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश उणवने व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी हे शहरी भागातून ग्रामीण भागात आलेल्या लोकांची चौकशी करून वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन करत आहेत. परंतु आता खरा संकटाचा काळ सुरू झाला असून बाधित शहरातून ग्रामीण भागात येणा-या लोकांमुळे कोरोनाचा शिरकाव होणार नाही याची दक्षता इतर यंत्रणांसह पोलिसांनी खर्या अर्थाने घ्यावी अशी मागणी देखील गेवराई तालुक्यासह तलवाडा व परिसरातील लोकांकडून होऊ लागली आहे.
Leave a comment