बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्याच्या हद्दीतून लातूर जिल्ह्यात जाण्यासाठी शहागड व नंतर चौसाळा चेकपोस्टवरील पोलीस व आरोग्य कर्मचार्यांशी हुज्जत घालणार्या आठ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रविवारी (दि.5) शहागड चेकपोस्टवरील 15 तर चौसाळा चेकपोस्टवरील 14 अशा 29 जणांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थान पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. आज सोमवारी सायंकाळपर्यंत हे अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त होणार आहेत. दरम्यान सदैव जनतेसाठी रस्त्यावर उतरुन कर्तव्य बजावणार्या या कर्मचार्यांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह यावेत यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिक प्रार्थना करु लागले आहेत.
लातूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या 8 जणांना बीड जिल्हा हद्दीत प्रवेश नाकारला गेला होता. शहागड तपासणी नाक्यावर त्यांनी पोलिस, शिक्षक व आरोग्य कर्मचार्यांशी प्रवेश मिळावा म्हणून हुज्जतही घातली होती. दरम्यान, ते आठजण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळल्यानंतर आता या नाक्यावरच्या 15 तर चौसाळा चेक नाक्यावरच्या 14 अशा 29 कर्मचार्यांच्या कोरोना तपासणीचा निर्णय घेण्यात आला. रविवारी रात्री शहागड व चौसाळा चेकपोस्टवर कर्तव्यावर असणारे पोलीस, आरोग्य व शिक्षक या सर्वांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. आज सोमवारी सायंकाळपर्यंत सर्वांचे अहवाल प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
बीड जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आलेली असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुणाला प्रवेश दिला जात नाही. लातूरला कोरोनाग्रस्त आढळलेले आठ जण शहागडमार्गे लातूरला गेले होते. शहागडहून बीड मार्गे ते लातूरला जाणार होते यासाठी रात्रीच्या वेळी त्यांनी शहागड चेक नाक्यावरुन बीड जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिस, शिक्षक व आरोग्य कर्मचार्यांनी त्यांना रोखले होते. जिल्ह्यात कोणत्याही स्थितीत प्रवेश नसल्याचे त्यांना सांगितले होते. या मुद्यावरत्यांनी कर्मचार्यांशी हुज्जतही घातली होती. त्यानंतर त्यांनी शहागडमध्ये मुक्काम करुन नंतर चोरट्या मार्गोने चेक नाका वगळून इतर मार्गाने लातूर गाठले होते. चौसाळा नाक्यावरुन हे लोक पुढे गेले. दरम्यान, त्या 14 पैकी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ज्या कर्मचार्यांशी त्यांनी हुज्जत घातली अथवा तेंव्हा जे लोक चेक नाक्यावर उपस्थित होतेबाशा 29 जणांच्या कोरोना तपासणीचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानंतर सर्वांचे स्वॅब तपासणीला पाठवले गेले आहेत.
आतापर्यंत 98 जणांचे स्वॅब तपासले
बीड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात प्रत्येकी 100 तर केज व परळी उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी 50 खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. दरम्यान आज सोमवारपर्यंत (दि.6) बीड जिल्हा रुग्णालयात 73 जणांचे तर स्वारातीमध्ये 25 अशा एकुण 98 जणांच्या घशातील लाळेचे स्वॅब राष्ट्रीय विषाणू संस्थान पुणे या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पैकी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल 40 जणांचे व अंबाजोगाईतील 24 अशा 64 जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. आता 29 कर्मचार्यांसह अन्य जिल्हा रुग्णालयातील 4 व स्वारातीमधील 1 अशा 34 जणांचे रिपोर्ट प्रतिक्षेत आहेत.
Leave a comment