व्यापारी, ग्राहकांना दुकानात घुसून मारहाण
व्यापाऱ्यांनी बोलावली बैठक
अघोषित दुकाने बंद ठेवण्याचा घेणार निर्णय
बीड | वार्ताहर
बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज बुधवारी पहाटे सुधारित आदेश जारी केले मात्र हे आदेश माहीत करून न घेता बुधवारी (दि.13) सकाळी बीड शहर पोलिसांनी सुभाष रोडवरील वव्यापाऱ्यासह ग्राहकांना दुकानात घुसून मारहाण केली, दुकानं बंद करायला लावुन व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली.नंतर जिल्हाधिकारी यांचे आदेश रात्री उशिरा निघाल्याने आम्हाला माहीत झाले नाहीत असे सांगत दिलगिरी व्यक्त केली. पोलिसांच्या या रझाकारीचा व्यापारी बांधवांनी तीव्र निषेध केला असून यासंदर्भात आज दुपारी एक बैठकही बोलावण्यात आली आहे. शहर ठाण्याचे निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी व्यापारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे समजते.
बीडच्या जिल्हाधिकारी यांनी आज बुधवारी पहाटे 2.32 वाजता सुधारित आदेश जारी केले. सर्व दुकाने (काही वगळून)शिथिलतेच्या काळात सकाळी सात ते दोनपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढले .त्याप्रमाणे व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली,मात्र साडेसात वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वासुदेव मोरे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुभाष रोडवर दाखल होत सुभाष रोडवर पायल साडी सेंटर,परिधान ड्रेसेस,आकाश इलेक्ट्रॉनिक या दुकानासह बहुतांश दुकानदारांना दमदाटी करत दुकानात घुसुन बेदम मारहाण करीत त्यांना पोलीस ठाण्यात नेले. यावेळी पोलिसांनी व्यापाऱ्यांशी असभ्य वर्तणूक तर केलीच पण ग्राहकांना देखील मारहाण केली.हा सगळा प्रकार म्हणजे व्यापारी जणू काही चोर आहेत अशा पद्धतीने करण्यात आला.हे झाल्यानंतर काही व्यापारी ठाण्यात गेले असता त्याना अपमानास्पद वागणूक देत हाकलून दिले.नंतर आपली चूक झाली आहे असा साक्षात्कार झाल्यावर व्यापाऱ्यांना मारहाण करणाऱ्या शहर पोलिसांनी पोलीस वाहनातून फिरत 'आम्हाला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची कल्पना नव्हती,आदेश उशिरा निघाला म्हणून हा प्रकार घडला' असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली .
वास्तवीक सात ते साडेनऊ या वेळेत कापड,किराणासह इतर दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश यापूर्वीच असताना पोलीसांना नव्या आदेशाची माहिती नसली तरी साडेसात वाजता मारहाण करण्याचे अधिकार कोणी दिले? नवे आदेश उशिरा काढले किंवा पोहचले नाही यात व्यापाऱ्यांचा काय दोष? हा सगळा प्रकार म्हणजे पोलिसांची दंडेलशाही असून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. शहर पोलिसांच्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी आज दुपारी व्यापारी यांनी एका बैठकीचे आयोजन केले असून दुकाने यापुढे सुरू ठेवायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. व्यापार्यांचे शिष्टमंडळ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घालणार आहेत.
Leave a comment