सर्वसामान्य नागरिकांनाही नोंदवता येणार तक्रारी
बीड | वार्ताहर
जिल्ह्यात सर्वत्र आरोग्यविषयी जनजागृती सुरू असताना काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे.या परिस्थितीला योग्य तऱ्हेने हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा टंचाई निवारण कक्षाची स्थापना केली असून गावातील कोणताही सामान्य ग्रामस्थ आपली तक्रार किंवा समस्या दूरध्वनी किंवा व्हाट्सअपच्या माध्यमातून कळवू शकतील अशी सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.
पिण्याचे पाणी आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध असल्याने जिल्ह्यात टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून टंचाई निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे या टंचाई कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोणत्याही भागात पिण्याच्या पाण्या संबंधी कोणतीही तक्रार अथवा समस्या असल्यास भ्रमणध्वनी क्रमांक 7499487262,9623777551 वर संपर्क साधू शकतात किंवा व्हाट्सअप वरून संदेश पाठवू न आपली तक्रार किंवा समस्या कळवावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.पाणी टंचाईच्या काळात गावातील सामान्य ग्रामस्थ जलसुरक्षक ग्रामसेवक स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी गावपातळीवर कर्मचारी हे संपर्क करतील त्यांच्या तक्रारींची व समस्यांची नोंद जिल्हा कक्षात घेण्यात येणार असल्याने टंचाई निवारणाचे काम सुलभ होऊ शकणार आहे.टँकर वेळेवर येत नसेल टँकरमध्ये पाणी कमी असेल अथवा गाळ मिश्रीत पाणी असेल टँकरमधील पाणी निर्जंतुक केलेले नसेल किंवा ठरवून दिलेल्या वरती भरत नसेल असे कोणतेही कारण असल्यास किंवा समस्या असल्यास त्यांचाही निवारण कक्षाशी संपर्क करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. जिल्ह्यात 1364 महसुली गावे असून व्हाट्सअपच्या माध्यमातून हे दूरध्वनी क्रमांक प्रत्येक गावात कळविण्यात आले असल्याने टंचाई निवारणाचे काम सुलभ होणार असल्याचे अजित कुंभार यांनी सांगितले. टंचाई निवारण कक्ष दोन कर्मचाऱ्यांची पूर्णवेळ नियुक्ती केली असून हा कक्ष पूर्ण कार्यक्षमतेने काम करेल अशा प्रकारचे नियोजन केले असून ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी सांगितले आहे.
Leave a comment