केज । वार्ताहर
केज आणि परिसरात परप्रांतीय मजूर अडकून पडले असून त्यांची गावी जाण्याची व्यवस्था करावी असा संदेश मिळताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तात्काळ दखल घेत; आम्ही त्या मुजुरांची त्यांच्या गावी पाठविण्यासाठी त्यांच्या राज्यातील जिल्हाधिकारी यांची परवानगी घेत आहोत असा मेसेज त्यांनी पाठविला. यामुळे मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केज आणि परिसरात झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश येथील कामगार आणि विद्यार्थी हे लॉकडाउनमुळे अडकून पडले आहेत. असे सुमारे दिडशे ते दोनशेच्या आसपास परप्रांतीय लोक आहेत. त्यापैकी दिडशे नागरिकांनी केज पोलीस ठाण्यात त्यांच्या गावी जाऊ देण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र,आधार कार्ड, मोबाईल क्रमांकासह नोंदणी केली आहे. पत्रकार गौतम बचुटे यांनी याबाबत त्या लोकांची जाण्याची व प्रवासाची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती करणारा मेसेज जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना पाठविला. अवघ्या पंधरा मिनिटाच्या अवधीमध्ये जिल्हाधिकारी यांनी तो मजकूर पाहिला अन् ‘येस वुई आर टेकिंग परमिशन टू देअर कलेक्टर’ असा संदेश त्यांनी पाठविला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांच्या सर्व व्यस्त कार्यक्रमातून एका संदेशाला उत्तर देऊन लॉकडाउनमध्ये अडकलेले परप्रांतीय आणि विद्यार्थी यांची तातडीने दखल घेत त्या भागातील जिल्हाधिकारी यांची परवानगी घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक होत आहे.
Leave a comment