व्हीसीव्दारे उपविभागीय अधिकारी
मुख्याधिकार्यासह सर्व तहसीलदारांना सूचना
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील सर्व जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात येत असून या पाण्याचा रक्षणाची जबाबदारी तहसीलदार यांना देण्यात येत आहे. यासाठी पथके नेमून जलसाठ्यांचे रक्षण केले जावे. माणसांबरोबरच जनावरांसाठी देखील पाण्याची उपलब्धता राहील असे नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले
मंगळवारी (दि.12) मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगति सभागृहात झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात, उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख पदाधिकारी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी आणि सर्व तालुक्यातील तहसीलदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, जिल्ह्यातील जलसाठ्याामध्ये असलेल्या पाण्याचा अवैध उपसा रोखण्यात यावा यासाठी अवैध मोटारी तात्काळ बंद कराव्यात. नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी लक्ष दिले जावे.तलाठी ्यांनी गावासाठी आवश्यक पाण्याचा साठा अथवा जवळचा जलस्रोत शोधून ठेवणे गरजेचे आहे दूषित पाण्यामुळे विविध आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्या दृष्टीने आरोग्य विभागाने काळजी घ्यावी. ते म्हणाले, जिल्ह्यातील सरासरी दूषित पाण्याचे प्रमाण 29 टक्के पर्यंत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितल्याने याच्या कारणांचा देखील शोध घेतला जावा व प्रक्रिया करून शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल याकडे लक्ष दिले जावे. याप्रसंगी तालुकानिहाय पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकारी स्तरावर आहेत यावेळी पाणी स्थिती चांगली असल्याने टँकर मंजुरीबाबत दक्षता घेतली जावी असेही रेखावार यांनी सांगितले.
मान्सून वेळेत न आल्यास आष्टी शहराबरोबरच तालुक्यातील गावांसाठी पाण्याचा पुरवठा राहण्याच्या दृष्टीने सीना प्रकल्पातील देखील पाण्याची गरज असून त्या दृष्टीने तालुका प्रशासनाने नियोजन करावे. आष्टी तालुका व धारूर मधील काही भाग वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यांना पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याचे दिसून येत असल्याने जुलै अखेरपर्यंत हे पाणी पुरवण्याच्या दृष्टीने संबंधित तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्यामार्फत नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.आढावा बैठकीत बीड जिल्ह्यातील विविध विषयांशी संबंधित कामाचा आढावा देखील जिल्हाधिकारी यांनी घेतला. यामध्ये कृषी विभागाच्या वतीने खरीप पेरणीसाठी खते व बियाण्यांची तयारी, जिल्हा आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील आजार व त्यादृष्टीने करण्यात येणारे पुर्वतयारी, पूरस्थिती उद्भवल्यास गावांचा संपर्क तुटू नये यासाठी उपाययोजना आणि नगर परिषद मार्फत पाण्याचा निचरा वेगात व्हावा यासाठी गटारी व नाले मोकळे करण्याची कामे केली जावे इत्यादी विषयांवर चर्चा होऊन सूचना करण्यात आल्या.
Leave a comment