सोलापूर | वार्ताहर
येथील विमानतळ परिसरात फटाके फोडल्याने भीषण आग लागली आहे. 9 वाजता परिसरातल्या लोकांनी फटाके फोडले. या फटाक्यांची ठिणगी तेथील गवतावर पडल्याने मोठी आग लागली. सध्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने या आगीत जीवतहानी झालेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (5 एप्रिल) रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करा आणि मेणबत्ती-पणती उजळवा, असं आवाहन मोदींनी देशवासियांना केले होते. या पार्श्वभूमीवर आज सर्व नागरिकांनी 9 वाजता दिवे बंद करुन मेणबत्ती-पणत्या पेटवल्या. पण याच दरम्यान सोलापूरमध्ये काही हुल्लडबाज तरुणांनी फटाके फोडले. त्यामुळे त्या परिसरात मोठी आग लागली.
कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. त्यासाठी रविवारी (5 एप्रिल) प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमची 9 मिनिटं द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, पणती-दिवा, मोबाईल लाईट किंवा टॉर्च लावा. त्यासाठी कोणालाही कुठेही एकत्र जमायचं नाही, रस्ते, गल्ली इथे जायचं नाही, सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पार करायची नाही” असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केलं होते.
9 मिनिटांनंतर एकेक दिवा लावताना प्रकाशाची शक्ती दिसेल. दिवे लावताना आपण एकटे नाही, असा संकल्प करा. आपण 130 कोटी जनतेची शक्ती दाखवून देऊ, कोरोनाच्या अंधकारमय संकटावर प्रकाशाने मात करु, असं मोदी म्हणाले होते.
दरम्यान, मोदींनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करुनही सोलापूरमध्ये काही हुल्लडबाज लोकांनी रस्त्यावर येत फटाके फोडले आहेत. याआधीही मोदींनी देशवासियांना थाळीनाद करण्याचे आवाहन केले होते. तेव्हाही नागरिकांनी रस्त्यावर येत मिरवणूक आणि प्रभात फेऱ्या काढल्या होत्या.
Leave a comment