डॉ.प्रविण सराफ यांनी कुंबामनी कुटुंबाला दिला आधार
गेवराई । वार्ताहर
महामारी आणि लॉकडाऊनच्या दुहेरी संकटाचा मुकाबला करणार्या नागरिकांना अनंत अडचणी येत आहे.गेल्या वीस दिवसापासून शहागड जवळच्या एका शेडमध्ये राहणार्या आंध्रप्रदेश राज्यातील कुंबामनी कुटुंबाला येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण सराफ यांनी आधार दिला आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, व कर्मचार्यांनी मानवता दृष्टीकोनातून केलेल्या या कामाचे कौतुक केले जात आहे. दरम्यान डॉ. राजेश आंधळे व पत्रकार जुनेद बागवान यांनी ही या कुटुंबाला गावी जाण्यासाठी तत्परतेने पुढे येऊन कागदपत्राची जुळवाजुळव करून बांधिलकी जोपासली आहे. रखरखत्या उन्हात दुचाकीवर जाऊन कुंबामनी कुटुंबाची भेट घेतल्याने सदरील कुटुंबातील लहान मोठ्या सदस्यांनी हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. संदीप मुळे यांनी दिलेले किराणा कीट, जेष्ठ पत्रकार सुभाष सुतार यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केले.
आंध्र प्रदेश राज्यातील कुंबामनी कुटुंब गेल्या काही वर्षांपासून सोलापूर येथे दुर्डी तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. या कुटुंबात लहान मोठे 19 सदस्य आहेत. धंदा होत नसल्याने त्यांनी बीड-औरंगाबाद जिल्ह्यात मार्च 2020 च्या पहिल्या आठवड्यात प्रवेश केला.परंतु, त्यांना शहागड चेकपोस्टवर अडविले. लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला जाता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या कुटुंबाने जवळच्या एका बंद असलेल्या हॉटेलच्या शेडचा सहारा घेतला. गाव एक हजार किलोमीटर दूर असून, काय करावे? काय खावे ? असा यक्ष प्रश्न उभा राहिला. धड मराठी येईना, ना हिंदी, परंतु अशा कठीण काळात भाषा महत्वाची नसते, भाव महत्त्वाचा आहे. हा भाव ओळखून डॉ. प्रविण सराफ यांनी कुंबामनी कुटुंबाला आधार दिला. त्यांच्याशी फोनवर तुटकी-मुटकी हिंदी भाषेत बोलून संपर्क ठेवला. त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. वीस दिवसापासून कोणालाही, काहीही न सांगता त्यांनी या कुटुंबाला मदत केली आहे. त्यांची आरोग्य तपासणी केली. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांनी मानवता दृष्टीकोनातून केलेल्या या कामाचे कौतुक केले जात आहे. डॉ. राजेश आंधळे, जेष्ठ पत्रकार सुभाष सुतार, पत्रकार जुनेद बागवान यांनी कुंबा कुटुंबाला गावी जाण्यासाठी तत्परतेने पुढे येऊन कागदपत्राची जुळवाजुळव करून बांधिलकी जोपासली आहे. रविवारी (दि.10) दुपारी रखरखत्या उन्हात दुचाकीवर जाऊन कुंबामनी कुटुंबाची भेट घेतली.
भगवान उनको बहोत खाना देना..!
कुंबामनी कुटुंबातील प्रमुख सदस्याने पत्रकारांशी बोलताना सदरील बाब सांगून कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘एक डाक्टर साहब ने खाने को देता, चार कट्टा राईस दिया,चाय-पत्ती दिया. अब तक पंधरा हजार रुपया का सामान दिया होगा. भगवान उनको बहोत खाना देना...’आणि एवढे बोलून ते निशब्द झाले. केवळ दोन्ही हात जोडले. रानावनात एकटे पडलेल्या कुटुंबाला डॉ.सराफ यांनी केलेली मदत खुप छोटी परंतू त्याच मोल करता न येणारी आहे. एका अर्थाने, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांनी मानवता दृष्टीकोनातून केलेल्या कामाची सुखद चर्चा होत आहे.
Leave a comment