धारुर । वार्ताहर
तालुक्यातील अंजनडोह ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या शिवनगर तांडा येथे पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळा संपत आला तरी अद्यापही कोणत्याच उपाययोजना केलेल्या नसल्याने पाण्यासाठी पायपीट करत पाणी डोक्यावर घेऊन येण्याची वेळ आली आहे. यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज आडे यांनी गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्या निवेदनाची दखल घेतली गेली नसल्याने युवराज झाडे आणि दत्ताभाऊ आडे सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करत आमरण उपोषणास बसले आहेत.
ोरोना संकटावर मात करण्यासाठी देशामध्ये प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना धारुर तालुक्यातील अंजनडोह येथील शिवनगर तांडा याठिकाणी नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी जीवाचे रान करत पायपीट करत डोक्यावर पाणी घेऊन येण्याची वेळ आली आहे. वेळोवेळी या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडे निवेदनाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. परंतु पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभार यामुळे आता येथील नागरिकांचा घसा कोरडा पडत असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. मागील काही दिवसांपूर्वी याच शिवनगर तांडा येथील महिला पाणी उपसा करताना विहिरीत पडून गंभीर जखमी झाली होती. परंतु अद्यापही पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या ठिकाणच्या नागरिकांना पाणी पुरवठा करण्याबाबत उदासीन दिसून येत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज आडे आणि आणि दत्ताभाऊ आडे यांनी पाच दिवसापूर्वी पंचायत समितीस निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरू केला नाही, तर आम्ही उपोषणास बसू असा इशारा दिला होता. निवेदन देऊन अद्यापही या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू झालेला नसल्याने याठिकाणी युवराज आडे, दत्ता आडे हे आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणास तांड्यावरील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Leave a comment