मुंबई: महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजनामुळे पॉवर ग्रीडवर कोणताच परिणाम झाला नाही. परिणामी दिवे बंद करण्याच्या आवाहनानंतर राज्यातील वीज पुरवठा सुरळीत असल्याची माहिती वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दिवे बंद करण्याच्या आवाहनानंतर राज्यात विजेच्या मागणीत सुमारे ३००० मेगावॅट घट झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज रात्री ९ वाजता वीज दिवे बंद करून दिवे लावण्यात आले. पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे पॉवरग्रीडवर परिणाम होऊन वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होईल अशी भीती वीज अभियंते, वीज तज्ञांनी व्यक्त केली होती. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही ऊर्जा विभागाची बैठक घेऊन आढावा घेत अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. आज, सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास राज्यात विजेची मागणी १४ हजार ५२ मेगावॅट
इतकी होती. तर, विजेचे दिवे बंद करण्यापूर्वी राज्यात रात्री ८.५५ वाजता विजेची मागणी ११ हजार ५०० मेगावॅट इतकी होती. तर, मुंबईत १७०० मेगावॅट इतक्या विजेची मागणी होती. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर दिवे बंद केल्यानंतर राज्यात विजेच्या मागणीत सुमारे २८०० ते ३००० मेगावॅटची घट झाली. परिणामी विजेची मागणी ही ८६६८ मेगावॅटपर्यंत आली. मुंबईतही विजेच्या मागणी सुमारे ४५० मेगावॅटची घट दिसून आली.
कोयना व टाटा पॉवरचे जलविद्युत प्रकल्प हे फायदेशीर ठरले. जलविद्युत प्रकल्पात मागणीनुसार वीज निर्मिती कमी जास्त करता येते. सुरुवातीला कोयना प्रकल्पातून १८३० मेगावॅट आणि टाटा पॉवरच्या खोपोली येथील वीज केंद्रातून ४०५ मेगावॅट वीज निर्मिती सुरू होती. विजेची मागणी जशी कमी होत गेली तशी तत्काळ कोयनेतून वीज निर्मिती ४१२ मेगावॅट, टाटाची १४ मेगावॅटपर्यंत वीज निर्मिती कमी करण्यात आली होती.
Leave a comment