अंबाजोगाई । वार्ताहर
हातभट्टीची दारू तयार करून विक्री केल्याप्रकरणी ऑगस्ट 2019 पासून आजपर्यंत तालुक्यातील कुसळवाडी तांडा व राडीतांडा येथे एकुण 32 गुन्हे दाखल झालेले आहेत. या आरोपींवर यापुर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, मात्र तरीही काही जण कारवाईला न जुमानता हातभट्टी दारू विक्री करत असल्याचे स्पष्ट झाल्याने या दोन्ही तांड्यावरील 12 जणांवर कलम 93 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईसाठी उपविभागीय दंडाधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
प्रतिबंधात्मक कारवाईसाठी उपविभागीय दंडाधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेल्यांमध्ये अविनाश प्रेमदास आडे,मिराबाई देसाई आडे, मारोती सुभाष जाधव,विजय हरिचंद्र आडे, बंडू देसाई आडे, लक्ष्मण महादेव आडे, प्रकाश वालचंद चव्हाण, चैनू ऊर्फ अंकुश नामदेव आडे, दिनकर नामदेव आडे, राजाभाऊ शेषेराव आडे यांच्यावर तसेच कुसळवाडी तांडा येथील व्यंकट गणपत राठोड, आण्याराव लक्ष्मण चव्हाण यांचा समावेश आहे असे पोलीस प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
दरम्यान सोमवारी (दि.11) बर्दापुर ठाणे हद्दीतील कुसळवाडी तांडा येथे गावठी हातभट्टीची दारु तयार करून विक्री करणार्यावर स्था.गु.शाच्या विशेष पथकाने छापा मारला. या कारवाईत आण्या लक्ष्मण चव्हाण,विजयकुमभार व्यंकटी राठोड व विठ्ठल हरीसिंग चव्हाण यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत साडेआठ हजारांची गावठी हातभट्टी दारू व रसायन जप्त करण्यात आले. याचदिवशी अंबाजोगाई ग्रामीण ठाणे हद्दीतील राडीतांडा येथे गावठी हातभट्टीची दारु तयार करून विक्री करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने छापा मारला. कारवाईत संतोष विश्वनाथ आडे, संजय महादेव आडे, उत्तम शंकर आडे,दिनकर नामदेव आडे, नरसिंग रंगनाथ आडे, अंकुश नामदेव आडे या सहा जणांवर दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून 15 हजार 850 रु किमतीचा गावठी हातभट्टी दारू व रसायन जप्त करण्यात आले.
------
Leave a comment