गेवराई । मधूकर तौर
गेवराईतील धान्य घोटाळा प्रकरणामध्ये गोडाऊन किपर संजय राजपुत यास सहआरोपी करत पोलीसांनी आज मंगळवारी (दि.12) अटक केली, तर नायब तहसीलदार अशोक भंडारी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक यांनी स्थापन केलेले एसआयटी पथक या प्रकरणाची कसून चौकशी करत असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
गेवराई शहरामध्ये भाजपा नगरसेवकपती अरुण मस्के यांच्या खाजगी गोदामात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 5 मे रोजी छापा टाकून लाखो रुपयांचे राशन धान्य आणि धान्य वाहतूक करणार्या 6 ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. यावेळी 9 लाख 74 हजार 950 रुपयांचा राशनसह 69 लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी गेवराई पोलीसात अरुण मस्केवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मस्के फरार आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी एसआयटी पथक स्थापन केले. दरम्यान आरोपी अरुण मस्के यांचा भाऊ मोहन मस्के याने या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्यास गेवराई शहरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर या पथकाने मंगळवारी गोडाऊन किपर संजय राजपुत यास सहआरोपी करत अटक केली तर नायब तहसीलदार अशोक भंडारीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
Leave a comment