जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट यांची माहिती
अंबाजोगाई । वार्ताहर
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा परिषदेच्या वतीने लॉकडाऊन दरम्यान परतलेल्या ऊसतोड कामगारांना जीवनावश्यक किराणा किटच्या वाटपास सुरूवात केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यात 17 एप्रिलच्या शासन आदेशानंतर बाहेरगावाहून आलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, जीवनावश्यक वस्तूंचे दर, ऊसतोड कामगारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 10 हजार 98 कुटुंबांना या किट वाटप करण्यात येत असून, यासाठी 65 लाख रुपये निधी ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आला आहे.17 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात नोंदणीकृत पद्धतीने परत आलेल्या आतापर्यंत 45 हजार ऊसतोड मजुरांची नोंद झाली आहे. या सर्व मजुरांना जिल्हा परिषदेच्या या मोफत किराणा किट वाटपाचा लाभ मिळणार आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत या वाटपाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिवकन्या शिरसाट यांचे पती शिवाजीराव सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली जोगाईवाडी जिल्हा परिषद गटात काळवटी तांडा या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेल्या 10 ऊसतोड मजुर कुटुंबियांना किराणा कीट वाटप करून करण्यात आले. यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या किट चे वाटप सुरू करण्यात आले असल्याचेही सौ. शिरसाट यांनी सांगितले. यावेळी शिवाजीराव सिरसाट, जिल्हा परिषद सदस्य सौ.जयश्री बालासाहेब शेप, प्रा. प्रशांत जगताप, श्री.पटेल, गटविकास अधिकारी संदीप घोणसीकर, काळवटी तांडा गावच्या सरपंच सौ.कमलताई चव्हाण, उपसरपंच सुरेश आडे, ग्रामपंचायत सदस्य राजेश जाधव, आण्णासाहेब राठोड, माणिक आडे, ग्रामसेवक ए.एम.लाखे, अजित चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोशल डिस्टन्स पाळून व मास्क वापरून किराणा वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
ऊसतोड कामगारांना सर्वोतोपरी सहकार्य करणार
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार परजिल्ह्यातून बीड जिल्ह्यात स्वगृही परतलेल्या ऊसतोड मजुर, कामगार बांधवांना सर्वोतोपरी सहकार्य करणार आहोत. जिल्हा परिषदेच्या फंडातून जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटपाचा शुभारंभ सोमवार पासून करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहून, लॉकडाऊन व कोरोनाच्या संकटकाळी सर्व समाज घटकांना दिलासा देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
Leave a comment