बीड । वार्ताहर
लॉकडाऊनमध्ये संचारबंदी आणि जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या हजारो वाहनधारकांवर बीड पोलीस प्रशासनाने कारवाई करून वाहने ताब्यात घेतली आहेत, मात्र आता ही वाहने सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून वाहनधारकांकडून पोलीस प्रशासनाला शंभर रूपयांच्या मुद्रांकावर शपथपत्र घेणे बंधनकारक केले आहे, मात्र नविन आर्थिक वर्षामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यापासून मुद्रांक विक्री करण्याची परवानगीच न मिळाल्यामुळे हे मुद्रांक वाहनधारकांना मिळेनासे झाले आहेत. जिल्हा मुद्रांक अधिकार्यांनी जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सदर मुद्रांक विक्रीची परवानगी घेऊन मुद्रांक उपलब्ध करून घ्यावेत अशी मागणी होत आहे. दरम्यान अधिकार्यांमध्ये असलेला समन्वयाच्या अभावाचा वाहनधारकांना फटका बसत आहे.
बीड शहरामध्ये लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी शिथील झाल्यानंतर विविध कामांसाठी नागरिक वाहंनाबरोबर बाहेर पडल्यानंतर ज्या नागरिकांकडे शहरात फिरण्याचा आणि वाहन चालविण्याचा पास नसेल अशा वाहनधारकांवर बीड वाहतूक शाखा तसेच बीड पोलीसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये हजारो वाहने जप्त करण्यात आली आहे. केवळ बीडमध्येच नव्हे तर राज्यातील सर्वच शहरामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान उन्हाच्या तीव्रतेत उभ्या केलेल्या वाहनांनी पेट घेऊ नये म्हणून वाहन सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून वाहनमालकाकडून वाहन मिळाल्याचे शपथपत्र घेणे पोलीस प्रशासनाला न्यायालयाने अर्थात शासनाने बंधनकारक केले आहे, त्यामुळे प्रत्येक वाहनधारकाला शंभर रूपयांचा मुद्रांक घेणे आवश्यक आहे. दरवर्षी 31 मार्च रोजी मुद्रांक परवाना नुतनीकरण करून घेऊन नविन आर्थिक वर्षात जुने मुद्रांक जमा करून नवे मुद्रांक घेणे मुद्रांक विक्रेत्यांवर बंधनकारक असते. यासंदर्भात जिल्हा मुद्रांक अधिकारी यांनी जिल्हा कोषागार कार्यालयाला कळविल्यानंतर जिल्हा कोषागार कार्यालयाकडून हे मुद्रांक उपलब्ध केले जातात. मुद्रांक विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना शपथपत्र देणे अवघड होऊन बसले आहे. यासाठी जिल्हा दस्त नोंदणी कार्यालय, रजिस्ट्री ऑफीसमध्ये शंभर रूपये जमा करून फ्रँकींग करून घेण्याचीही सुविधा आहे, मात्र प्रशासनात अवमेळ असल्याने वाहनधारकांना मुद्रांक उपलब्ध न झाल्यामुळे वाहन ताब्यात घेणे अवघड होवुन बसले आहे. या संदर्भात जिल्हा मुद्रांक अधिकारी आणि जिल्हा कोषागार अधिकारी यांनी समन्वय साधुन यातून मार्ग काढावा अशी मागणी होत आहे.
Leave a comment