आष्टी । वार्ताहर
अत्यावश्यक सेवेच्या वेळेत बदल केल्याने आष्टी शहर वगळता इतर गावातील सकाळी खरेदीसाठी होणारी गर्दी ओसरली आहे. आष्टीमध्ये मात्र पूर्वीचीच वेळ कायम असल्याने ही वेळ वाढवण्याची मागणी होत आहे.
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेची दुकानाची वेळ विषम तारखेला सकाळी सात ते साडेनऊ अशी होती. एक दिवसाआड फक्त अडीच तासांचा वेळ मिळत असल्याने भाजीपाला, किराणा खरेदी आणि बँक याठिकाणी एकच झुंबड उडत असे. सोमवार पासून यात बदल झाल्याने कडा, धानोरा, धामणगाव यासारख्या गावात ही गर्दी काहीशी ओसरली असल्याचे चित्र होते. सकाळच्या वेळेतील काही काळ वगळता दुपारी दुकानदार निवांत असल्याचे चित्र होते. बँकामात्र लवकर बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली. दरम्यान कडा गावपेक्षा बाजारपेठ छोटी असून ही केवळ नगरपंचायत आहे म्हणून आष्टी शहरात सकाळी अडीच तास दुकाने उघडण्यास परवानगी आहे. त्यातच निडली अँप वापरण्यात यावे असे आदेश आहेत. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहक यांच्यात नाराजी आहे. आष्टी शहरातील दुकानाची वेळ ही वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँकेत सर्वाधिक गर्दी होत असताना तिथे मात्र केवळ अडीच तासांचा वेळ पुरेसा नाही. ही वेळ ही किमान सकाळी सात ते बारा किँवा सकाळी नऊ ते दुपारी दोन करण्यात यावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
Leave a comment