नेकनूर । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरे शटडाऊन झाल्याने गावाकडे येणार्याची गर्दी होऊ लागली आहे. यातच शासनाने यांना गावाकडे येण्यासाठी परवानगी दिल्याने येणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे. गावागावात आलेली माणसे संशयाच्या नजरेत अडकले असून विशेषत: पुणे, मुंबई, औरंगाबाद येथून येणार्या माणसावर संशयाचे धुके वाढल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात शासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन झाले असून येणार्यानी काही दिवस दूर राहून काळजी घेणे जरुरी आहे.
कामानिमित्त मुंबई, पुणे येथे स्थलांतरित असलेले दिवाळीच्या सणाला अथवा उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन-चार दिवसांसाठी गावाकडे येणारे तर काही कधीच गावाकडे न फिरकणारे काही दिवसापासून गावात दाखल होत असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा, व्यवसाय, कँपन्या बंद असल्याने शिवाय शहरातच कोरोनाचे रुग्ण आढळल्याने गावाचा सुरक्षित पर्याय म्हणून चारचाकी, दुचाकी वाहने कुटुंबासह दाखल होत आहेत. कुटुंबातील सदस्य किँवा जवळचे नातेवाईक सकाळीच दारात दिसून येत असल्याने आधीच या रोगा बद्दल भीतीचे वातावरण असल्याने काय करावे या विवंचनेत गावातील माणसे अडकले आहेत. दूर कसे थांबवे ही तर आपलीच माणसे मात्र गावात फिरताना शहरातून आलेल्याना प्रश्नार्थक नजरा बरंच काही बोलणार्या आहेत.आता तर चोरून लपून येणार्या पेक्षा शहरातील अनेकांना गावापर्यंत पोचण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. यामुळे ग्रामीण भागात शहरी माणसाची गर्दी पुढील काळात होणार असली तरी शहरातून येणारे गावात काही काळासाठी पूर्णपणे वेगळी राहणे गरजेची आहेत. शहरातील रुग्णसंख्याचा वाढता आकडा अफवा भीती, संभ्रम निर्माण करीत असल्याने गावखेड्यांचा घोर वाढू लागला आहे.
Leave a comment