बीड पालिकेने हातगाडे जप्त केल्याने विक्रेते हतबल
बीड । वार्ताहर
शासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार बीड शहरात संचारंबदी शिथिलतेच्या वेळेत सोमवारी (दि.11) सकाळी भाजीपाला व फळविक्रीसाठी विक्रेते रस्त्यावर आले. मात्र या विक्रेत्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता, विनाकारण बीड नगर परिषद प्रशासनाने त्यांच्या भाजीपाला, फळ, हातगाड्यांवर जप्ती आणली. त्यामुळे हे विक्रेते हतबल झाले. दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी तातडीने विक्रेत्यांच्या भावना ऐकून त्यांना धीर दिला. पालिका अधिकार्यांची तात्काळ बैठक घेत नियमात राहून व्यवसाय करणार्या कोणत्याही विक्रेत्याला यापुढे त्रास देण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा दिला.
संचारबंदी शिथिलतेदरम्यान सोमवारी सकाळी शहरातील काही भाजीपाला व फळविक्रेते आपले हातगाडे घेवून भाजीपाला विक्रीसाठी शहरातील रस्त्यांवर थांबले होते. दरम्यान नगरपालिका अधिकारी-कर्मचार्यांनी त्या विक्रेत्यांचे हातगाडे कसलीही पुर्वसूचना न देता ताब्यात घेतले. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे हतबल झालेल्या विक्रेत्यांचा अक्षरशः रडू आले. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच आ.संदीप क्षीरसागर यांनी विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व तातडीने बीड नगर परिषद कार्यालयात भेट देऊन उपस्थित अधिकार्यांशी चर्चा केली.यावेळी शहर ठाण्याचे पोलीसही उपस्थित होते.
यावेळी त्यांना नियमात राहून व्यवसाय करणार्या कोणत्याही विक्रेत्याला यापुढे त्रास देण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा दिला. तसेच जे लोक नियमाच्या विरोधात जाऊन रस्त्यावर येऊन व्यवसाय करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी सूचना देखील केली. हातावर पोट असणार्या सामान्य विक्रेत्यांना त्रास देणे हे अतिशय वेदनादायी आहे. बीड नगर परिषद प्रशासनाच्या आजच्या भूमिकेचा आपण निषेध करत असल्याचेही आ.संदीप क्षीरसागर यांनी म्हटले.
Leave a comment