मुंबई । वार्ताहर
राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांना वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे असे राज्य शासनाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनतेला आश्वस्त केले असून टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणार्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या आणि औषधांच्या पुरवठ्याबाबत राज्य शासनाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात शासन करीत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर तपशील विशद करण्यात आला आहे.
अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक, मजूर-कामगारांना प्रवासासाठी पासेस अशा काही उपाययोजनांमुळे, राज्यात लॉकडाऊनच्यानंतर किरकोळ विक्रीची दुकाने, किराणा दुकाने यांच्यासंदर्भात काही प्रमाणात निर्माण झालेली परिस्थिती गेल्या सहा सात दिवसांमध्ये सुधारली आहे. तांदूळ, गहू, गव्हाचे पीठ, कडधान्य खास करून तूर आणि चनाडाळ, खाद्यतेल, कांदे, बटाटे, साखर, मीठ, मसाले यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा राज्यात तुटवडा नाही, असे स्पष्ट करून स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून अन्न धान्याचा पुरवठा करण्यासाठी राज्यात मुबलक प्रमाणात धान्याचा साठा उपलब्ध आहे, याची ग्वाही शासनाने दिली आहे.भारतीय अन्न महामंडळ किंवा केंद्राच्या गोदामांमध्ये अन्नधान्याची कोणतीही कमतरता नाही. एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून ऑईल कंपन्यांकडूनही त्यांचा नियमित पुरवठा होत आहे. पुरवठा कामगारांचा तुटवडा असूनही गॅस सिलिंडर ग्राहकांना घरपोच करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यामध्येही गती आली आहे, याकडे पत्रकात लक्ष वेधण्यात आले आहे. दुधाचाही कोठेही तुटवडा नाही. उलट, दुधाच्या पुरवठा क्षमतेपेक्षा त्याची विक्री कमी होत असल्याचे दिसते आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर बाजार समित्यांमध्ये फळे आणि भाजीपाल्यांची आवक वाढली असून शेतकर्यांकडून थेट खरेदीही वाढली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांच्या माध्यमातून भाजीपाल्याची विक्री होत असून मोठ्या इमारतींमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत ही व्यवस्था अजून वाढविण्यात येईल, असे आश्वासन शासनाने दिले आहे.
काही किरकोळ दुकानांमध्ये कमी माल उपलब्ध असल्याचे निदर्शनास येऊ शकते. परंतु या दुकानांची साठा करुन ठेवण्याची क्षमताच मुळात कमी असते, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय, लॉकडाऊननंतर या दुकानांमध्ये गर्दी करून ग्राहकांनी वस्तूंची मागणी एकदम मोठ्या प्रमाणात केल्याने साठा संपण्यास सुरुवात झाली. राज्यांतर्गत होणार्या माल वाहतुकीवर आणि पॅकेजिंग उद्योगावर हे क्षेत्र बर्यापैकी अवलंबून आहे. मजूर कमी संख्येने उपलब्ध असणे आणि पॅकेजिंगसाठी लागणार्या वस्तूंची कमतरता असणे यामुळे काही प्रमाणात पुरवठा साखळीवर थोडा परिणाम झाला असला तरीही, विशेषत: हा मुंबईसारख्या मोठ्या शहरातील किरकोळ दुकानांच्या क्षेत्रातील पुरवठा साखळी सुरळीत व्हावी याकरिता मोठ्या व्यावसायिकांबरोबर राज्य शासनाची यंत्रणा सातत्याने संपर्कात आहे, याकडे प्रसिद्धी पत्रकात लक्ष वेधले आहे. असंघटीत क्षेत्रातील किराणा दुकाने ही पुरवठा साखळीची अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत. ही दुकाने उघडी असतील याची दक्षता घेण्यात येत आहे. बहुतेक किराणा दुकाने उघडी असतात आणि त्यांच्याकडे अत्यावश्यक वस्तू / अन्नधान्य साठा येण्याला सुरवात झाली आहे. डिटर्जंट आणि साबणाच्या पुरवठ्याबाबत राज्यात कोठेही मोठा तुटवडा नाही. या क्षेत्राशी संबंधित सर्व संघटनांच्या संपर्कात प्रशासन यंत्रणा आहे आणि पुरवठा साखळी सुधारण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात आहेत. औषधे, लहान मुलांचे खाद्य, इन्सुलिन आदींच्या पुरवठ्याबाबत कोठेही मोठा तुटवडा नाही. औषध दुकानदार संघटना संबंधित शासकीय विभागाच्या संपर्कात सातत्याने आहे. औषध दुकानदारांना होणारा पुरवठा सातत्यपूर्ण कसा राहील त्याचबरोबर औषध निर्मिती क्षेत्रातील सर्व घटक आपल्या मालाची निर्मिती कशी सुरु ठेवतील याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसातच थोड्या प्रमाणात का असेना ही निर्मिती सुरु होईल हे निश्चित आहे. कारण जीवनावश्यक वस्तू आणि औषधे यांच्या निर्मितीकरिता त्यांच्या कारखान्यांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली असल्याने हे कारखाने सुरू होण्यासाठी कोणताही प्रत्यवाय उरलेला नाही.
*स्वस्त धान्य दुकानांमधून वितरण सुरळीत*
गेल्या पाच दिवसात स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य घेणार्या लाभार्थीपैकी सुमारे 30% धान्य उचलले आहे. उर्वरित धान्य उचलण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेतील मोफत तांदूळवाटप लवकरच सुरु होईल. ‘मोफत वाटपासाठी आलेला तांदूळ पैसे घेऊन विकला जात आहे’, अशा तक्रारी प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत, तथापि मुळात मोफत तांदळाचे वाटपच अजून सुरू झाले नसल्याने या बातम्या तथ्यहीन आहेत. मोफत तांदूळ वाटपासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमधून धान्याची वाहतूक सुरु झाली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.विशेष महत्त्वाचे म्हणजे किराणा दुकाने ही अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उघडी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Leave a comment