अंबाजोगाई । वार्ताहर
सध्या जगातील जवळपास 110 देशात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. प्रत्येक देश व तेथील नागरिक कोरोनाला मोठ्या हिंमतीने सामोरे जात आहेत. त्या-त्या देशातील तथा राज्यातील प्रशासन आपल्या कर्मचार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची सेवा घडवून घेत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी हे कोरोनाला हरवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. वेळप्रसंगी हे सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून इतर नागरिकांसाठी झगडत आहेत.
आजच्या परिस्थिती मध्ये मंदीरातील देव कुलूपबंद अवस्थेत असून डॉक्टर हेच देव गणल्या जात आहेत. त्यामुळे त्यांचा सत्कार व सन्मान सर्वत्र केला जात आहे.मात्र दुर्लक्षित असे नगरपरिषद कर्मचारी तसेच स्वतःला धोक्यात घालून गाव, शहर,वाडी,वस्ती स्वच्छ करणारे स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार व सन्मान करणे हे आपले त्या कर्मचार्यांप्रती उत्तरदायित्व असल्याचे समजून अंबाजोगाई शहरातील धडाडीचे कार्यकर्ते व समाजसेवक ताहेरभाई व त्यांच्या मित्र मंडळ यांच्या वतीने आज सकाळी सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल कदम, समीर लाटा, अर्जुन काळे, सिद्धार्थ साबळे,अतुल कसबे, रोहित साठे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सत्कार सोहळ्यात स्वछता कर्मचारांचे कौतुक करताना ताहेरभाई म्हणाले की, समाजातील प्रतिष्ठित असे डॉक्टर व नर्स यांचा मानसन्मान तर सर्व करत आहेत आणि त्यात काही गैर असे काहीच नाही. मात्र आपल्या भागातील असून देखील नेहमी दुर्लक्षित होणारे नगरपरिषदेच्या स्वछता कर्मचार्यांचा देखील यथोचित मानसन्मान झाला पाहिजे.ते देखील आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांचे देखील समाजावर ऋण आहे.त्या ऋणांतून काही अंशी का होईना आपण उतराई झाले पाहिजे केवळ याच उद्देशाने आजचा हा कौटुंबिक सत्कार सोहळा साजरा होत आहे.या प्रसंगी उपस्थित समीर लाटा, राहुल कदम, पत्रकार गोविंद खरटमोल यांनी सर्व कर्मचा-यांचे अभिनंदन व कौतुक केले. या कौटुंबिक हृदय सत्कार सोहळ्यात प्रामुख्याने नगरपरिषद कर्मचारी सुशिलकुमार साठे, रमाकांत सोनकांबळे व स्वच्छता कर्मचारी नारायण होके, रविंद्र साठे, अविनाश होके, गणेश होके, सुखदेव गायकवाड, लक्ष्मण काळे, प्रशांत रणदिवे, महादू साठे, अरूण साठे, राम चव्हाण आदी स्वच्छता कर्मचार्यांचा हृदय सत्कार व सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास सातपुते यांनी केले तर उपस्थितांचे आभार अविनाश साठे यांनी मानले.
Leave a comment