बीड । वार्ताहर
खरीप हंगामासाठी शेतकर्यांकडून शेतीची मशागतीचे काम सुरू झाले आहे. काहीजण खते, बियाणे व कीटकनाशकांची खरेदी करणार्या शेतकर्यांची फसवणूक होऊ नये यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार जिल्हाभरात कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्राची तपासणी केली जात आहे.
बीड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांच्या सुचनेवरून जिल्हाभरातील विविध ठिकाणी तालुका कृषी अधिकारी व गुणनियंत्रण अधिकार्यांच्या पथकाने कृषी सेवा केंद्राची तपासणी केली. यावेळी बीडमध्ये 6, अंबाजोगाईत 9, पाटोदा 4, केज 5 व इतर ठिकाणी अशाच प्रकारे कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी केली. यावेळी काही दुकानदारांकडे खताचा साठा आढळून आला, यावेळी सर्व बिलांची व स्टॉक रजिस्टरची पाहणी केली. तसेच खते, कीटकनाशक व बियाणांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. काही दोष आढळल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई करून जप्तीची कारवाई केली जाणार आहे. खते, बी-बियाणे, कीटकनाशकासंदर्भात तक्रार असल्यास संबंधित कृषी मंडळ किंवा तालुका कृषी अधिकार्यांकडे संपर्क साधावा असे कळवले आहे.
Leave a comment