बीड | वार्ताहर
लॉकडाऊनमध्ये घरात राहणाऱ्या नागरिकांना वाढत्या तापमानामुळे प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतो आहे. एकीकडे ही स्थिती असताना रविवारी (दि.10) दुपारी मात्र बीडमधील वातावरण बदलून गेले.दुपारी तीनच्या सुमारास अचानक आकाशात ढग जमून आले, अन् वादळी वारे सुरू झाले. क्षणार्धात मान्सूनपूर्व सरी बरसतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.
कडाक्याचे ऊन... असह्य उकाडा...वादळी वारे...अन् काही वेळाने भरून आलेले आभाळ... अशीच काहीसे चित्र रविवारी दुपारी बीडमध्ये पाहायला मिळाले. सध्या कोरोनामुळे संपूर्ण बाजारपेठा बंद आहेत, अशावेळी नागरिकांना घरात बसून राहण्याशिवाय पर्याय नाही. दरवर्षी बीड जिल्ह्यात एप्रिलच्या अखेरीस आणि संपूर्ण मे महिन्यात तापमानात प्रचंड वाढ होते. मे महिन्यामधील तापमान 42 ते 44 अंशापर्यंत पोहोचते. यंदाही तापमानात प्रचंड वाढ होत चालली आहे त्यामुळे वाढत्या उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. टाळेबंदीमुळे सर्व इलेक्ट्रॉनिक दुकाने बंद असल्याने यंदा अनेकांची कूलर, फॅन खरेदीही रखडली आहे.
वाढत्या उकाड्यामुळे नागरिक घामाघुम होत असतानाच रविवारी दुपारी तीननंतर बीडमध्ये वातावरणात अचानक बदल झाला. आकाशात ढगांची गर्दी होऊन झाकोळून आले. काही वेळातच वेगाने वाहणारे वारे सुरू होऊन पावसालाही सुरुवात होते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.दरम्यान सायंकाळपर्यंत बीडमध्ये आभाळ भरून राहिल्याने गारवा निर्माण झाला होता.सध्या जिल्ह्यात मान्सूनपूर्व तयारीला वेग आला आहे. शेतकरीही खरिपाची तयारी करण्यासाठी कामाला लागले आहेत. शेत नांगरणी करून ठेवले जात आहे. जिल्ह्यात दरवर्षी खरिपात कापूस आणि सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतीची कामे करता यावी तसेच खते बी-बियाणे खरेदी करून ठेवता यावी यासाठी 11 मे पासून ग्रामीण भागातील संचारबंदी शिथलीकरणाची वेळ जिल्हा प्रशासनाने वाढवून दिली आहे.
बीड ;पाटोदा, लिंबागणेश परिसरात पाऊस
रविवारी दुपारी बीड ,पाटोदा तालुक्यातील काही भाग आणि बालाघाटावरील मांजरसुबा, नेकनूर, लिंबागणेशसह अन्य भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. रायमोहा, आदी अवकाळी पावसाने आंब्याचे नुकसान झाले तर शेतातील भाजीपाला देखील वाया गेला आहे.
Leave a comment