गेवराई । वार्ताहर
लाखोंच्या रेशन धान्य गैरव्यवहार प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्यातील आरोपी भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. त्याची हकालपट्टी करण्याऐवजी आ.लक्ष्मण पवार हे या प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचे सांगून ते किती धुतल्या तांदळासारखे आहेत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. आजवर मस्के सारख्या अनेक माफियांना सोबत घेत त्यांचा राजकीय लाभ घेऊन आमदारकीचे फळ चाखनार्यांनी आज संबंध नाही म्हणणें हास्यास्पद असून स्वतः चे पाप झाकण्यासाठी दुसर्यावर खापर फोडून पत्रकबाजी करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच आहेत. अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे यांनी केली.
आ.लक्ष्मण पवार यांच्या पत्रकाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे यांनी उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की दि.5 मे रोजी गेवराई येथील भाजप नगरसेविका यांचा पती अरुण मस्के यांच्या राजवीर पंपाच्या मागील गोदामावर छापा मारून लाखो रुपये किमतीचा गहू, तांदूळ, साखर तसेच 6 ट्रक जप्त करून पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धडाकेबाज कारवाई केली. त्यामुळे भाजपाच्या तंबूत घबराहट पसरली. त्यामुळे जनतेलाही खरे राशन माफिया व त्यांची पाठराखण करणारे राशन सम्राट कोण हे लक्षात आले. असे असताना आ.लक्ष्मण पवार यांनी शनिवारी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिध्दी पत्रक काढून विरोधक आपली बदनामी करत असल्याचा आरोप केला. वास्तविक कोणीही त्यांच्यावर जाहीर आरोप केले नाहीत परंतु नकटे वरमले या उक्ती प्रमाणे ते स्वतःच खुलासा करत आहेत हे पाहून लोकांचा संशय दृढ झाला आहे. पाच वर्षे गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता असतांना रेशनच्या काळाबाजाराची साखळी आमदारांना तोडता आली नाही आणि आज ती तोडण्याची भाषा करत आहेत. त्यांचा या प्रकरणात संबंध नाही तर त्यांनी अरुण मस्केची हकालपट्टी का केली नाही? आमदार पवार तुम्ही स्वतःला इतके धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. मग अनेक कार्यक्रमांमध्ये तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारा राशन माफिया आहे हे तुम्हाला कळाले नाही का? एवढी मोठी कारवाई झाली असताना त्याची साधी हकालपट्टी देखील तुम्ही केली नाही यावरून सिद्ध होते की तुम्ही त्याचे पाठीराखे आहात. त्यांच्या या भूमिकेमुळे आम्हालाही आता संशय येऊ लागला आहे की तुम्ही देखील यात वाटेकरी आहात की काय ? असो तुमची ती सवयच आहे. पत्रकात पुढे म्हटले की, आपण दर्जेदार कामे केल्याचे सांगतात टक्केवारी घेत नाही म्हणतात, मग तालुक्यात अनेक रस्त्यांची वर्षाच्या आत वाट लागली, रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली हीच का तुमची प्रामाणिक कामे ? यात तुम्ही टक्केवारी घेतली नाही तर मग या गुत्तेदारांना तुम्ही ब्लॅक लिस्टमध्ये का नाही टाकले ? असो तुमची ही स्वतःचे झाकून ठेवायचे व दुसर्याचे वाकून पहायचे ही पद्धत सर्वांना माहीत झाली आहे. तुम्ही कार्यकर्त्यांचे पाप झाकण्यासाठी आटापिटा करत आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा जनता ही सुज्ञ आहे. गेवराई येथील कारवाईमुळे राशन माफियाच्या पाठीशी असलेला खरा राशन सम्राट आता लपून राहिला नाही. त्यामुळे तुम्ही दुसर्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आधी आपल्या लाडक्या राशन माफिया ची हकालपट्टी करा व मग तुमचे प्रामाणिकपणाचे ज्ञान सांगा. विरोधकांवर टीका करण्याची ही वेळ नाही गोरगरिबांच्या तोंडचा घास पळविणार्या कार्यकर्त्यावर कारवाई न करता विरोधकांवर टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत हे लक्षात ठेवा अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे यांनी केली.
Leave a comment