केज । वार्ताहर
तालुक्यातील काळेगाव घाट येथे एका परप्रांतीय मजुराचा शासकीय पाणीपुरवठा विहिरीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी (दि.9) दुपारी 4 वाजेच्या सुमारास ाळेगाव घाटच्या पूर्वेला असलेल्या बोभाटी नदी पात्रातील विहिरीत ही घटना घडली.
शमीम राज (21, रा. तुलसीपूर जि.बालमपूर, उत्तरप्रदेश) असे मयत मजुराचे नाव आहे. काळेगावघाट येथील नितीन लक्ष्मण तांदळे यांचे आळंदी रोड मोशी, पुणे येथे माऊली फर्निचर या नावाचे फर्निचर तयार करण्याचा कारखाना आहे. त्यांच्याकडे शमीम राज हा मजुर सहा महिन्यांपासून कामाला होता. दरम्यान कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्यामुळे पुणे येथील काम बंद होते. लॉकडाउनमुळे उत्तरप्रदेशकडे जाणार्या सर्व गाड्या बंद असल्यामुळे तो त्याच्या गावी न जाता नितीन तांदळे यांच्या सोबत तो एक महिन्यापासून काळेगावघाट येथे येऊन त्याचे घरी राहत होता.
शनिवारी दुपारी चारच्या दरम्यान शमीम राज हा काळेगाव घाटच्या पूर्वेला असलेल्या बोभाटी नदी पात्रातील सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर आंघोळ करण्यासाठी गेला. त्याने विहिरीवरील रहाटाला दोर बांधून विहिरीत उतरून अंघोळ करीत असताना तोल जाऊन पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विहिरीजवळ वरच्या बाजूला त्याचे कपडे आणि बूट काढून ठेवलेले आहेत. तसेच दोराच्या एका टोकाला बकेट बांधलेली आहे. त्याला जर पोहता येत नव्हते तर तो विहिरीत उतरलाच कसा ? या बाबतही संशय व्यक्त होत आहे. विहिरीत सुमारे तीस फूट पाणी आहे. रात्री 8:15 पर्यंत त्याचा मृतदेह विहिरीतून पाण्याबाहेर काढण्यात यश आले नाही. घटनास्थळी हेडकॉन्स्टेबल जाधव, अमोल गायकवाड आणि सिरसट यांनी भेट दिली.
Leave a comment