अंबाजोगाई (वार्ताहर)
विधान परीषदेच्या रिक्त नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होऊ घातलेली आहे. या जागांपैकी काँग्रेस पक्षाच्या कोट्यामधील जागेसाठी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांना आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यासोबतच राजेश धोंडीराम राठोडयांना देखील काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. सोमवारी राजकिशोर मोदी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राजकिशोर मोदी हे गेली चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून गेली २५ वर्षे त्यांनी अंबाजोगाई नगर परीषद आपल्या ताब्यात ठेवली आहे. काँग्रेस पक्षाने आजपर्यंत त्यांच्या पक्षनिष्ठेची दखल घेतली असून पाच वर्षे वैधानिक विकास महामंडळ, १० वर्षे कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्षपद, राज्य कार्यकारिणीत सहसचीव, आणि आता जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष दोन जागा लढवणार आहे. या जागांसाठी राजकिशोर मोदी आणि राजेश धोंडीराम राठोड यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत असल्याचे आज शनिवारी सायंकाळी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले. राजेश राठोड हे जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. एनएसयूआयपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव म्हणूनही ते संघटनेत काम करत आहेत.
Leave a comment