प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे जिल्हाधिकार्यांचे निर्देश
बीड । वार्ताहर
कोरोनाने आधीच सर्वांची धाकधूक वाढविलेली असताना आता जिल्ह्यात डेंग्यू व चिकनगुनियाच्या साथरोगाने वेगाने हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. माजलगाव, परळी धारुरमध्ये डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय सुरु केले आहेत. जिल्हा तूर्त कोरोनामुक्त असला तरी डेंग्यू, चिकनगुनियाला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. नागरिक व ग्रामपंचायतींनी खबरदारी बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
बडि जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा सध्या कोरोनाविरुध्द दोन हात करत आहे. महसूल, पोलीस व आरोग्य विभाग यासाठी परिश्रम घेत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपायांमुळे ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक ही मंडळीही सध्या कामात व्यस्त आहे. आष्टी तालुक्यात आढळलेला एकमेव बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे;परंतु कोरोनामुक्त जिल्ह्यांंच्या यादीतील स्थान अबाधित रहावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. याचवेळी डेंग्यू व चिकन गुनियानेही डोके वर काढले आहे.सध्या उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई आहे. त्यामुळे लोक पाणी साठवून ठेवण्यावर भर देत आहेत. 10 दिवसांपेक्षा अधिक दिवस साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये एडिस एजिप्टाय या डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. हा डास डेंग्यू व चिकुनगुनिया या विषाणूचा वाहक आहे.त्यामुळे नागरिकांनी देखील दक्ष राहणे अपेक्षित आहे. पाण्याच्या टाक्या, रांजण, हौद शक्यतो झाकून ठेवावेत, शनिवार हा कोरडा दिवस पाळावा, यामध्ये सर्व पाणीसाठे स्वच्छ पुसून ठेवावेत, डासांपासून बचावासाठी मच्छरदाणी, डास पळविणारे धूप, मलम यांचा वापर करावा, घराच्या छतावर असलेले जुने टायर, फुटके डबे, नारळाच्या करवंट्या काढून नष्ट कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
येथे आढळले डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण
माजलगाव येथील दबडगावकर कॉलनी, तालुक्यातील आबेगाव, सादोळा, मनूरवाडी येथे डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. धारुर शहरातील मठगल्ली, तालुक्यातील संगम येथेही या साथरोगाने हातपाय पसरविले आहेत. परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा, गाडेपिंपळगाव येथेही डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण असल्याचे समोर आले आहे.या सर्व गावांमध्ये आरोग्य विभागाची पथके तळ ठोकून आहेत.
पालिका, ग्रामपंचायतींना खबरदारीच्या सूचना
साथरोगांना आळा घालण्यासाठी नगरपालिका व ग्रामपंचायतींना प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. ग्रामपंचायतींनी परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व डबके, नाल्या वाहत्या कराव्यात,नगरपालिका तसेच नगरपंचायतींनाही अशाच प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.
Leave a comment