बीड । वार्ताहर
प्राणघातक हल्ला प्रकरणात सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्ह्यात अटक दोन आरोपींनी जिल्हा रुग्णालयातून पलायन केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. बुधवारी (दि.6) यातील एकाला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या आरोपींनी रुग्णलयातून पलायन कसे केलेयाची चौकशी स्वत: पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी हाती घेतली आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयातील सीसीटिव्ही फुटेजही मागवले गेले असल्याची माहिती पोद्दार यांनी दिली.
‘बाहेरगावी जाण्यासाठी दुचाकी का दिली नाही’ म्हणून एकाला इरफान शेख व आसेफ बागवान यांनी मारहाण केली होती. सिरसाळा पोलिसांत दोघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद होता. पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. कारागृहात दोघांना दाखल करण्यासाठी दोन कर्मचारी सरकारी वाहनातून आले. मात्र,कोरोना तपासणी करुन कैदी कारागृहात घेतले जात असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले गेले. रुग्णालयातून पोलिसांना गुंगारा देऊन दोन्ही आरोपी पसार झाले होते. बीडमध्ये पकडण्याचा प्रयत्न करताना पोलिसांच्या हातावर त्यांनी तुरी दिल्या होत्या. दरम्यान,बुधवारी यातील आसेफ बागवान याला वडवणीतून वडवणी पोलिसांनी अटक केली होती. तर दुसरा आरोपी फरारच आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी आता एसपी हर्ष पोद्दार यांनीच हाती घेतली आहे. सीसीटिव्ही फुटेज पाहून हे आरोपी कसे पाळाले,पोलिस कर्मचारी कुठे होते वगैरे बाबींची चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल असे पोद्दार यांनी सांगितले.
Leave a comment