बीड | सुशील देशमुख
भाजीपाला खरेदी करत असताना शहरातील एका नागरिकाचा मोबाईल गहाळ झाला. वडिलांचा मोबाईल चोरीला गेल्याने त्या नागरिकाचा मुलगा चिंतेत पडला. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना आपले 'रोल मॉडेल' मानणाऱ्या त्या मुलाने चक्क त्यांना पत्र लिहिले, ते ही इंग्रजीतून. वडिलांचा चोरीला गेलेला मोबाईल आपण नक्की सापडून द्याल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पत्र मिळताच पोलीस अधीक्षकांनीही यंत्रणा कामाला लावली अन् गहाळ झालेला तो मोबाईल सापडला. महत्त्वाचे हे की, हा मोबाईल परत देताना एसपी हर्ष पोद्दार यांनी त्या विद्यार्थ्यांसोबत सेल्फी घेतला.
शुभम भीमराव सानप असे पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून वडिलांचा मोबाइल परत मिळणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव. शहरातील कालिकानगरमध्ये राहणारा शुभम नववीच्या वर्गात शिक्षण घेतो. भाजीपाला खरेदीसाठी गेल्यानंतर त्याचे वडील भिमराव सानप यांचा मोबाईल गहाळ झाला होता. याबाबत त्यांनी शुभमला माहिती दिली होती.नंतर शुभमने 28 एप्रिलला पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना एक पत्र लिहून मोबाईलचा आयएमइआय क्रमांक दिला. "तुम्ही माझे रोल मॉडेल आहात तुम्ही नक्कीच मोबाईल सापडून देण्यासाठी चांगले प्रयत्न करतात" अशी अपेक्षाही त्यांनी पत्रात व्यक्त केली होती.
दरम्यान पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा यशस्वी तपास केला.त्यानंतर हा मोबाईल घेऊन जाण्यासाठी सानप कुटुंबीय अधीक्षक कार्यालयात दाखल झाले, तेव्हा अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते शुभम मोबाईल सुपूर्द करण्यात आला. दरम्यान यावेळी अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्याच मोबाईलच्या कॅमेरातून शुभम सोबत एक सेल्फी घेतला. यावेळी शुभमच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मोठेपणी आपल्याला आयपीएस अधिकारी व्हायचे असल्याचा मनोदयही त्याने यावेळी व्यक्त केला.
Leave a comment