हातभट्टी दारु विक्रेत्यांविरुध्द बीड पोलिंसाची मोहिम
बीड । वार्ताहर
संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात अवैध धंदे सुरु ठेवणार्यांविरुध्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात दि. 3 ते दि.7 मे या कालावधीत विविध ठाणे हद्दीत 25 ठिकाणी केलेल्या छापेमारीत चार लाख 67 हजारांची दारु जप्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, अप्पर अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षकल ठाणे प्रभारी व पोलीस कर्मचार्यांनी या कारवाया केल्या.या कारवाईचे नागरिकातून स्वागत केले जात आहे.
बीड जिल्ह्यात 3 मे रोजी विविध ठाणे हद्दीत अवैध दारू विक्रेते व हातभट्टी दारू बनवणार्या एकूण 6 ठिकाणी छापे मारण्यात आले. या प्रकरणात सात आरोपींविरुध्द दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला ; तर 42 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. 4 मे रोजी चार ठिकाणी केलेल्या कारवाईत 4 जणांवर गुन्हे दाखल झाले. त्यांच्याकडून 23 हजार 930 रुपयांची गावठी दारु जप्त केली गेली. मंगळवारी (दि.5) पाच अड्ड्यांवर छापे मारत 5 आरोपींकडून 1 लाख 3 हजार 395 रुपयांची दारु जप्त करण्यात आली. बुधवारी (दि.6) जिल्ह्यात 4 ठिकाणी पोलीसांनी छापे मारत 6 जणांवर गुन्हे दाखल करून 67 हजार 800 रु.किमंतीचा मुद्देमाल जप्त केला. गुरुवारी (दि.7) पुन्हा 4 ठिकाणी कारवाई करत 8 जणांवर गुन्हे दाखल करत त्यांच्याकडून 2 लाख 29 हजार 900 रुपयांचा दारुसह मुद्देमाल जप्त केला गेला.
Leave a comment