बीड । वार्ताहर
बीड जिल्हा रुग्णालयासह केज उपजिल्हा रुग्णालयातून बुधवारी (दि.6) पाठवलेल्या 12 पैकी 8 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले होते. तर 4 जणांचे अहवाल प्रलंबित होते. ते अहवालही आज गुरुवारी कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता गुरुवारी पाठवलेल्या 43 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून 11 तर केज उपजिल्हा रुग्णालयातून 1 असे एकुण 12 स्वॅब प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले होते. त्यातील 8 जणांचे अहवाल बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झाले होते. ते सर्व कोेरोना निगेटिव्ह होते. उर्वरित 4 अहवालांची प्रतीक्षा होती. ते अहवालही गुरुवारी सायंकाळी 4.45 वाजता जिल्हा आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले. सर्व चारही अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
आता 43 अहवालांची प्रतीक्षा
गुरुवारी सकाळी आणखी 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यात बहुतांश स्वॅब कोटाहून बीड जिल्ह्यात परतलेल्या विद्यार्थ्यांचे आहेत. या स्वॅब अहवालाकडे आता आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लवकरच ते अहवालही प्राप्त होतील असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
Leave a comment