सामाजिक आणि राजकिय मदती शिवाय विकास कसा होईल !
बुद्धजयंती विशेष/ विजय आरकडे
केज-कळंब महामार्गावर आणि बीड जिल्ह्यातील व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सिमेलगत बुद्धसृष्टीत आपल्या आयुष्याची सर्व पुंजी खर्च करून सेवा निवृत्त गटविकास अधिकारी त्रिवेणिताई कसबे यांनी उभारलेल्या भव्य अशा बुद्ध मूर्तीचा परिसर हा आज बुद्धसृष्टी म्हणून ओळखला जात आहे. परंतु अद्याप या बुद्धसृष्टीला सामाजिक आणि राजकीय मदत न मिळाल्यामुळे अजूनही याचा विकास झालेला नाही.
केजपासून अवघ्या पंधरा किमी अंतरावर आणि कळंबपासून तर फक्त तीन किमी अंतरावर केज-कळंब या दोन तालुक्यांच्यामध्ये भव्य अशी सुमारे वीस फूट उंचीची पंचधातूंची सुवर्ण कमळाच्या फुलात पद्मसनातील महाकरुणीक तथागत गौतम बुद्धांची भव्य सोनेरी मूर्ती उभारलेली आहे. हा सुमारे एक ते दीड एकरचा परिसर हा बुद्धसृष्टी म्हणून ओळखला जातो. अत्यंत शांत आणि नयनरम्य हा परिसर आहे. बुद्ध मूर्तीच्या चबुतर्याच्या गोलाकार विविध रंगी गुलाब आणि मनमोहक फुलझाडे लावलेली आहेत. तर परिसरात हिरवेगार गालीच्या सारखे लॉन लक्ष वेधून घेत आहे. या ठिकाणी गेल्यास मन अगदी प्रसन्न आणि शांत व सर्व विसरून एक वेगळ्याच विश्वात गेल्याचा भास होतो. मनावरील सर्व ताण तणाव दूर होतो. प्रवेशद्वारावर नव्याने उभारलेली सोनेरी रंगाची सांचीच्या स्तुपाची प्रतिकृती अगदी अचंबित करते. या बुद्ध सृष्टीचे विषेश हे या ठिकाणी जे दोन बोधिवृक्ष आहेत ते बुद्धगया या पवित्र ठिकाणी गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले; त्याची फांदी या ठिकाणी लावलेली असून ते दोन्ही बोद्धीवृक्ष म्हणजे बुद्धसृष्टीची शान आहे. त्याच बरोबर परिरात विविध रंगी अशी हमखास बहरलेली गुलझाडे मन आकर्षित करून घेतात.
आता या बुधसृष्टीच्या विकासाठी त्रिवेणिताई कसबे त्यांनी स्वतःची जमीन, पैसा, रात्रंदिवस मेहनत घेऊन सुमारे पन्नास लाख रु. पर्यंत गुंतवणूक केली आहे. प्रत्येक पौर्णिमेला या येथे अन्नदान व खीर दान केले जाते. तसेच बुद्ध जयंती,आंबेडकर जयंती, रमाबाई आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ जयंती, शिवाजी महाराज, शाहू महाराज, स्त्रीमुक्ती दिन, कामगार दिन, नामविस्तार दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन असे सर्व कार्यक्रम संपन्न होतात.या ठिकाणी अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी भेटी देऊन त्रिवेणिताई कसबे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र आता या परिसराचा विकास करण्यासाठी आणि या ठिकाणी सुसज्ज असे विपश्यना केंद्र, भिक्कु निवास, वाचनालाय आणि निवासाची व्यवस्था यासाठी समाजातील दानशूर आणि राजाश्रय मिळणे आवश्यक आहे.
अभ्यास केंद्र आणि विपश्यना केंद्र व्हायला हवे
महाकरुणीक बुद्ध मूर्तीला मेघडंबरी,बुद्धसृष्टी एक बौद्ध धर्माचे अभ्यास केंद्र आणि विपश्यना केंद्र व्हायला हवे हीच माझी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया आयु.त्रिवेणिताई कसबे यांनी व्यक्त केली.
Leave a comment