कोटाहून परतलेल्या विद्यार्थ्यांचीही तपासणी
बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यातून आज गुरुवारी (दि.7) पुन्हा एकदा 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी ही माहिती दिली. दरम्यान बुधवारी पाठवलेल्या 12 पैकी 8 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर 4 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, त्यामुळे आता एकूण 47 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
नीटसह इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बीड जिल्ह्यातून सुमारे ५० विद्यार्थी राजस्थानमधील कोटा शहरात गेले होते. लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकून पडले होते. त्यांचे पालक चिंतेत होते. प्रशासनाकडून जिल्ह्यात प्रवेशबंदी केली.अखेर हा प्रश्न मंत्रालयात उच्च स्तरावर गेल्यावर महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना शासनाने परत आणले. बीड जिल्ह्यातील ५० विद्यार्थी मागच्याच आठवड्यात परत आले. प्रशासनाने त्यांना होम क्वारंटाईनच्या सूचना दिल्या होत्या. तेंव्हापासून हे विद्यार्थी होम क्वारंटाईन आहेत. मात्र, लक्षणे न दिसताही कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने या विद्यार्थ्यांचीही काेरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यानुसार आज गुरुवारपासून टप्प्याटप्प्याने या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून-40, अंबाजोगाई-4, केज उपजिल्हा रुग्णालयातील 3 अशा एकूण स्वॅब तपासणी अहवालाची प्रतीक्षा आरोग्य यंत्रणेला आहे. गुरुवारी बीड जिल्हा रुग्णालयातून जे स्वॅब तपासणीला पाठवले आहेत त्यात बहुतांश स्वॅब कोटाहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांचे आहेत. लक्षणे नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य यंत्रणेकडून ही तपासणी केली जात आहे.
आता एकूण 47 अहवालांची प्रतीक्षा असून लवकरच अहवाल प्राप्त होतील.एकाचवेळी इतके स्वॅब तपासणीला पाठवण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. आजपर्यंत बीड जिल्ह्यातून तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या स्वॅबची संख्या आता 279 वर पोहोचली आहे, यापैकी 218 जणांचे 232 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
स्वॅब तपासणीला घेण्यासाठीचे सेंटर वाढवणार
यापूर्वी बीड जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाईत स्वाराती रुग्णालयात या संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात होते; परंतु बुधवारपासून केज रुग्णालयातूनही ही व्यवस्था केली गेली आहे.नजीकच्या काळात जिल्ह्यात स्वॅब तपासणीला घेण्यासाठी रुग्णालयात आणखी सेंटर वाढवले जाणार आहेत असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.
Leave a comment