दंडुक्याचे रट्टे गरीबांनाच का?-अॅड.अजित देशमुख
बीड । वार्ताहर
कोरोना महामारीचे संकट मोठे आहे. सामान्य जनता प्रशासनाचे आदेश पाळत आहे. जनतेला काहीच कारण न विचारता दंडुक्याने झोडपले जाते. मात्र काही मोठे अधिकारी विना पास आणि विना परवानगी सोलापूरहून बीडमध्ये येतात. त्यामुळे या अधिकार्यांसह चेक पोस्टवर झोपा काढणार्या अधिकार्यांना जेलमध्ये घालण्याची मागणी करत जालन्यात अशा अधिकार्यांवर गुन्हे दाखल होतात तर बीड मध्ये का नाही? असा प्रश्न जन आंदोलनाचे विश्वस्त अॅड. अजित देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
सोलापूर जिल्ह्यात दुर्दैवाने रुग्ण सापडत आहेत. या जिल्ह्यातून हे अधिकारी विना पास येतात. याची माहिती जन आंदोलनाने जिल्हा प्रशासनाला दिल्या नंतर या अधिकार्यांना फक्त होम क्वारंटाईन केले जाते. हेच बडे अधिकारी जिल्हाधिकार्यांच्या दालनातील बैठकांना हजर असतात. मोठे अधिकारी जर विना परवानगी अथवा आरोग्याची रीतसर तपासणी न करता आणि जिल्हा प्रशासनाला माहिती न देता येत असतील, तर हे योग्य नाही. सुदैवाने येणारे अधिकारी चांगल्या प्रकृतीचे होते. मात्र असा लपंडाव केला जात असेल तर तो धोकादायक आहे. मग जिल्हाधिकारी कार्यालयात नियम मोडणारे अधिकारी घुसत असतील तर जिल्हाधिकारी कार्यालय देखील सुरक्षित आहे का? हा प्रश्न निर्माण होईल.
या दोनपैकी एका अधिकार्यांने पासची पोलिस प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र पास मिळालेला नव्हता. तर दुसरे अधिकारी आणि त्यांच्यासह अन्य दोन जण आले होते. त्यांनी तर परवानगी घेतलेली नव्हती आणि पासची मागणीही केली नव्हती.चेकपोस्ट हे गोर गरिबांच्या नाड्या अडवण्यासाठी आहेत का? मोठ्या अधिकार्यांशी संगनमत केले जाते का? अधिकारी जिल्हा का ओलांडत आहेत, हे का पाहिले जात नाही? का तिथेही आर्थिक व्यवहार होतात, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे होत आहेत. दरम्यान, हे लोक ज्या कार्यालयात गेले होते, त्या कार्यालयातील अन्य कर्मचार्यांमध्ये देखील या अधिकार्यांना होम क्वारंटाईन केल्याने घबराट निर्माण झाली आहे. असे असतानाही यातील एक बहाद्दर अधिकारी पुन्हा परवानगी न घेता सोलापूरला गेल्याचे समजते. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी यात तातडीने लक्ष घालावे. या आलेल्या अधिकार्यांसह अन्य जे अधिकारी अशी जा-ये करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये घालावे. हे अधिकारी आले त्या सर्व चेक पोस्ट वरील अधिकार्यांच्या बदल्या करून कारवाई करावी, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.
पोलीसाचे दंडुके आता इकडेही चालू द्या
जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन महामारीच्या काळात योग्य निर्णय कठोर पणाने घेत असताना अन्य अधिकार्यांना गांभीर्य का नाही, हे कळत नाही. सामान्य माणसाला रट्टे देणारे पोलीसाचे दंडुके आता इकडेही चालू द्या. सर्वांना समान न्याय द्या, अशी मागणीही अँड. अजित देशमुख यांनी केली आहे. तर जिल्हा प्रशासनाने या संदर्भात काय कारवाई केली ? याची माहिती आम्हाला दोन दिवसात द्यावी, अन्यथा आम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडे जावे लागेल, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.
Leave a comment