बीडच्या प्रशासनाचा निर्णय, आधीच केेले आहेत होम क्वारंटाईन
बीड । वार्ताहर
नीट व इतर स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी राजस्थानमधील कोटा शहरात गेलेले बीडचे विद्यार्थी अखेर मागच्या आठवड्यात प्रशासनाच्या प्रयत्नाने परतले. शहरात आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना होम क्वारंटाईन केले असले तरी आता सर्वांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुमारे 50 जणांनी टप्प्याटप्प्याने कोरोना चाचणी केली जाईल. आज गुरुवारपासून टप्प्याटप्प्याने या तपासण्या होतील अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांनी दिली.
नीटसह इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बीड जिल्ह्यातून सुमारे 50 विद्यार्थी राजस्थानमधील कोटा शहरात गेले होते. लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकून पडले होते. त्यांचे पालक चिंतेत होते. प्रशासनाकडून जिल्ह्यात प्रवेशबंदी केली.अखेर हा प्रश्न मंत्रालयात उच्च स्तरावर गेल्यावर महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना शासनाने परत आणले. बीड जिल्ह्यातील 50 विद्यार्थी मागच्याच आठवड्यात परत आले. प्रशासनाने त्यांना होम क्वारंटाईनच्या सूचना दिल्या होत्या तेंव्हापासून हे विद्यार्थी होम क्वारंटाईन आहेत. मात्र, लक्षणे न दिसताही कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने या विद्यार्थ्यांचीही कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
Leave a comment